पोलीस उपअधीक्षक प्रमोद लोखंडे यांना राष्ट्रपती पोलीस पदक

0
34
1

राज्यपाल यांच्या हस्ते पदक प्रदान

         गोंदिया/धनराज भगत

भारत राखीव बटालियन-२, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १५, बिरसी कॅम्प गोंदिया या आस्थापनेवरील पोलीस उपअधीक्षक प्रमोद लोखंडे यांना २६ जानेवारी २०२२ रोजी राष्ट्रपतीचे पोलीस पदक प्राप्त झाले असुन ६ जून २०२४ रोजी राज्यपाल, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या हस्ते “पदक अलंकरण समारंभ” राजभवन मुंबई येथे प्रदान करण्यात आलेले आहे.
          सदर पोलीस अधिकारी १ ऑक्टोबर १९९१ पासुन महाराष्ट्र राज्य पोलीस दलात रुजु असुन त्यांचे ३३ वर्षांचे सेवाकाळातील कर्तव्यात २६ ऑगस्ट १९९४ रोजी पहाटे ५.०० वाजता पोलीस दलाव्दारे गाव सिंदसुर जि. गडचिरोली येथे अॅन्टी नक्षल ऑपरेशन राबविण्यात आले होते, ज्यामध्ये दोन नक्षलवादी यांना ठार मारण्यात यश आले असून मोठ्या प्रमाणात शस्त्रे, दारुगोळा, जिलेटीन व इतर उपकरणे प्राप्त करण्यात आली होती. सदर अभियानात धैर्याने व साहसाने पुढाकार घेतले. सन २०१७ व २०१८ मध्ये आदर्श पोलीस अधिकारी म्हणून सलग दोनदा निवड करण्यात आली असून पोलीस महांसचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे हस्ते प्रशंसापत्र व सोर्ड ऑफ ऑनर देवुन वर्धापन दिनी गौरविण्यात आले. त्यांच्या सेवाकालावधीमध्ये त्यांना विविध उत्कृष्ट कामगीरीकरिता ६४८ बक्षीसे व १२८ प्रशंसापत्र प्राप्त झाली आहे.
          फिल्ड क्राफ्ट ट्रॉफी- सन २०१८, फिल्ड क्राफ्ट ट्रॉफी ध्वस्त ढाचा शोध एव बचाव सन २०२०, फिल्ड क्राफ्ट ट्रॉफी ध्वस्त ढाचा शोध एवं बचाव सन २०२१ व फिल्ड क्राफ्ट ट्रॉफी सिएसएसआर, एमएफआर, हायराईस, एमएफआर, व एफडब्ल्यूआर + एमएफआर सन २०२२ मध्ये प्रात्यक्षिकात महाराष्ट्र राज्य मुंबई मध्ये प्रथम क्रमांक पटकाविलेला आहे. पोलीस महांसचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेतर्फे प्रशंसापत्र व फिल्डक्राफ्ट ट्रॉफी देवुन गौरविण्यात आले.
          सदर पोलीस अधिकारी यांच्या सेवेत स्वर्ण जयंती पदक- १९९७, विशेष सेवा पदक- २०१०, आंतरिक सुरक्षा सेवा पदक- २०१०, पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह पदक- २०११, मा. राष्ट्रपतीचे गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक- २०२२, स्वातंत्र्य दिवस अमृत महोत्सव पदक- २०२२ मध्ये उल्लेखनीय व वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीकरिता गौरविण्यात आले आहे.
पूरपरिस्थीतीत केलेले उल्लेखनीय कार्य : ७ जूलै २०१८ रोजी नागपूर जिल्ह्यात अतिवृष्टीने गंभीर पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने पावसाच्या पाण्यात अडकलेले आदर्श संस्कार स्कूल येथील ५९५ विद्यार्थी, शिक्षक व स्टाफ यांना सुरक्षीत ठिकाणी हलविण्याचे कार्य केले. २९ ऑगस्ट २०२० ते ०१ सप्टेंबर २०२० पर्यंत मौजा चिंचघाटता ता.कुही जि.नागपूर येथील गोसीखुर्द धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमध्ये अडकलेल्या गावातील १३३३ नागरिकांना सुरक्षीत ठिकाणी हलवून बचाव कार्य केले. २९ ऑगस्ट २०२० ते १ सप्टेंबर २०२० पर्यंत लाडज, ता. ब्रम्हपुरी, जि.चंद्रपूर येथील गोसेखुर्द धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमध्ये अडकलेल्या गावातील १४७२ नागरिकांना इष्ट ठिकाणावरुन अत्यंत प्रतिकुल व धोकादायक स्थितीवर मात करुन मदत व बचाव कार्य पुर्णत्वास नेले. पुरात, कॅनल, नदी, विहीर व तलावामध्ये बुडुन मृत पावलेल्या ईसमांचा शोध बाबत १२ मोहीम केले असून त्यामध्ये १६ मृत देह प्राप्त करुन कुटूंबियांच्या स्वाधिन केले. पूरपरिस्थितीत अडकलेल्या नागरिकांचे बचाव कार्यामध्ये ६ मोहीम केले असुन त्यामध्ये ३८२७ नागरिकांना सुखरुप ठिकाणी पोहचविले. जनजागृती अभियानामध्ये  पूरपरिस्थिती, अतिवृष्टी, भूकंप, आपातकालीन परिस्थितीत घ्यावयाची काळजी बाबत १२,८५० स्थानिक नागरिकांना माहीती दिली. २ मॉकड्रिल मध्ये प्रती १२०० नागरिकांच्या संख्येत यशस्वी कार्यवाही केली.