मागील वर्षी झालेल्या गारपीट व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पिकवीमासह शासकीय आर्थिक मदत द्या…….

0
19
1

वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- गजानन पोटदुखे

दिनांक :- 11 जून 2024

युवा संघर्ष मोर्चाचे तहसीलदारांना निवेदन

देवळी:मागील हंगामात संपुर्ण देवळी तालुक्यात मोठया प्रमाणात गारपीट होऊन शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आधीच शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन या पिकांचे उत्पन्नात मोठी घट झाली असून शेतकऱ्यांची सर्व भिस्त रब्बी हंगामातील गहू व चना या पिकांवर होती. मात्र अचानक झालेल्या गारपिटीमुळे तीही आशा मावळली व शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना योग्य प्रमाणात पिकविम्याची नुकसानभरपाई मिळणे अत्यावश्यक असून अजून पर्यत मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. ज्या पिकांकडून शेतकऱ्यांना आशा होती ते पिक सुध्दा गारपिटीमुळे उध्वस्त झाले होते. याला बराच काळ लोटला असून पेरणीची वेळ येऊनही राज्य शासनातर्फे अद्याप नुकसानभरपाई व पिकविम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नाही. काही शेतकऱ्यांना पिकविम्याची नुकसानभरपाई मिळाली परंतु अजूनही मोठ्या प्रमाणात शेतकरी पिकविम्यापोटी मिळणाऱ्या नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. आता पेरणीचा हंगाम असल्यामुळे शेतकऱ्यांना पैशाची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे तातडीने पिकवीमा व शासकीय मदत शेतकऱ्यांना देण्यात यावी अशी मागणी युवा संघर्ष मोर्चाचे अध्यक्ष किरण ठाकरे यांनी शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत तहसीलदारा मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली. सध्या पेरणीचा हंगाम असल्याने बरेच शेतकरी पीकविमा तसेच शासकीय नुकसानभरपाईच्या आशेवर असून जर वेळेवर ही रक्कम मिळाली नाही तर भविष्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. पीक विम्याची रक्कम तातडीने न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी किरण ठाकरे, गौतम पोपटकर, मंगेश घुंगरूड, संदीप दिघीकर,लोमहर्ष बाळबुधे, समीर सारजे,स्वप्नील मदनकर, मनोज नागपुरे, शरदराव भोयर, उमेश ठाकरे, सिद्धार्थ राऊत, गौरव खोपाळ, अनुप खापरकर, प्रदीप खैरकार, प्रशांत केने, नारायण राऊत, विनय महाजन, अमोल भोयर, मनीष पेटकर, मयूर ढुमने व शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.