गडचिरोली/प्रतिनिधी
भामरागड तालुक्यातील निसर्गरम्य बिनागुंडा येथे कुटुंबासह सहलीला गेलेल्या दोन जणांचा धबधब्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना काल दुपारी अडीच वाजताच्या सुमारास घडली. बादल श्यामराव हेमके(३९) रा.आरमोरी आणि नवनीत राजेंद्र धात्रक(२७) रा.चंद्रपूर अशी मृतांची नावे आहेत.
नवनीत धात्रक हा बादल हेमके यांचा साळा आहे. हेमके हे भामरागड तालुक्यातील पल्ली ग्रामपंचायतीचे ग्रामसवेक होते. ते भामरागड येथे वास्तव्याने होते. ७ जूनला नवनीतचे लग्न झाने. त्यानंतर तो पत्नीसह हेमके यांच्या घरी गेला. आज दोघांचेही कुटुंबीय बिनागुंडा येथील धबधबा पाहण्यासाठी गेले. त्यावेळी नवनीत आंघोळीसाठी पाण्यात उतरला. मात्र तो खोल पाण्यात बुडाला. त्याला वाचविण्यासाठी हेमके हे मदतीला धावले. मात्र, दोघांनाही पोहता येत नसल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. दोघांच्याही कुटुंबीयांच्या समक्ष ही हृदयद्रावक घटना घडली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर लाहेरी येथील पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. दोघांचेही मृतदेह भामरागड येथे शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. लग्नाला चार दिवस होत नाही;तोच पतीने प्राण गमावल्याने पत्नी शोकविव्हळ झाली आहे.

