मत्स्यपालन व्यवसायातून प्रतिमा मौजे यांची स्वयंरोजगारातून समृध्दीकडे वाटचाल

0
28
1

गोंदिया / धनराज भगत

        श्रीमती प्रतिमा कैलाश मौजे हया मु. कोहळीटोला, पो. डव्वा, ता. सडक अर्जुनी, जि. गोंदिया येथील रहिवासी असून त्यांचे शिक्षण 12 वी पर्यंत झालेले आहे. सदर महिला दारिद्रय रेषेखालील कुटूंबातील असून त्यांचे पती दुसऱ्यांच्या शेतामध्ये रोजंदारीने कामाला जात असल्यामुळे घरची पुर्ण जबाबदारी त्यांच्यावर होती. घरची परिस्थिती बरोबर नसल्यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी काय करावे हे त्यांना सूचत नव्हते, परंतु हिंमत हारायची नाही आणि काहीतरी करुन दाखवायचे हे त्यांच्या मनामध्ये होते. एके दिवशी अचानक त्यांच्या पतीची प्रकृती बिघडली व सगळ्या कुटूंबाची संपुर्ण जबाबदारी त्यांच्यावर आली. मुला-मुलीचे शिक्षण सुध्दा कठीण झाले होते, त्यामुळे त्या फार चिंतेत होत्या.
        एके दिवशी उमेदच्या महिला बचतगटाच्या सभेमध्ये त्यांना सामुदायिक संसाधन व्यक्ती (CRP) यांनी आरसेटी म्हणजे काय ? व तेथे होणाऱ्या विविध प्रशिक्षणाची माहिती दिली व घरच्या घरी राहून मुलांचा सांभाळ आणि स्वयंरोजगार कसे करता येईल याबद्दल सविस्तर माहिती दिली. प्रतिमा ही मत्स्य सखी असल्यामुळे त्यांना मत्स्यपालनाचे प्रशिक्षण घ्यावे असे वाटले. त्यांनी कोणताही विलंब न करता आरसेटी कार्यालयाशी संपर्क साधून मत्स्यपालन या प्रशिक्षणात आपले नाव नोंदविले आणि 10 दिवशीय मत्स्यपालन प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षणा दरम्यान मासोळ्यांच्या जाती, त्यांना लागणारे खाद्य व त्यांचे प्रकार यांची माहिती मिळविली आणि विविध खेळाच्या माध्यमातून आत्मविश्वास, धोका पत्करणे धाडस, माहितीचा शोध अशा विविध गुणांना आत्मसात केले व मत्स्यपालनात मिळणाऱ्या योजना उदा. मत्स्यसंपदा अशा अनेक योजनांची माहिती मिळविली व 10 दिवशीय प्रशिक्षण पूर्ण केले.
        प्रतिमाने गावातील स्वयं सहायता समुहाच्या मदतीने मत्स्यपालन या व्यवसायाला सुरुवात करण्याचे ठरविले. त्यासाठी महिला बचत गटातून सुरुवातीला 50 हजार रुपये कर्ज घेतले आणि स्वत: जवळचे 30 हजार रुपये गुंतवणूक केली. हळूहळू उत्पन्न वाढू लागले, त्यामुळे जगण्याची व परिस्थितीवर मात करण्याची त्यांच्यात नवी उम्मीद निर्माण झाली. मिळणाऱ्या बचतीतून त्यांनी स्वयं सहायता समुहाच्या कर्जाची परतफेड केली व आता एकटीने 25 ते 30 हजार रुपये पर्यंत मासोळ्या विकून स्वत:चा व्यवसाय करीत आहे.
        प्रतिमाने स्वत:चा रस्ता स्वत:च तयार केला आहे. त्यांनी परिस्थितीवर मात करुन यश संपादित केले असून सदर व्यवसायातून ती तिच्या कुटूंबाच्या इच्छा पुर्ण करीत असल्यामुळे ती आता खुप आनंदी आहे. त्यामुळे इतर महिलांनी सुध्दा नोकरीच्या मागे न लागता आपला स्वत:चा व्यवसाय सुरु करुन आपली आर्थिक उन्नती साधावी असे त्यांनी यावेळी सांगितले. स्वयंरोजगारासाठी प्रतिमाची मानसिकता घडविल्याबद्दल तिने ग्रामीण स्वरोजगार प्रशिक्षण संस्था (RSETI) गोंदियाचे खुप खुप आभार मानले.