गोंदिया/धनराज भगत
प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2024 मध्ये शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याची अंतिम मुदत 15 जुलै 2024 आहे. सन 2023-24 पासून सर्वसमावेशक पीक विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना प्रती अर्ज केवळ 1 रुपया भरुन पीक विमा पोर्टलवर नोंदणी करावयाची आहे. खरीप 2024 करीता भात (तांदूळ) पिकासाठी निश्चित करण्यात आलेली विमा संरक्षित रक्कम 43 हजार 750 रुपये आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी गोंदिया जिल्ह्यासाठी युनिव्हर्सल सोम्पो जनरल इंन्शुरन्स कंपनी लिमिटेड ही कंपनी नेमण्यात आली असून 18002005142/ 18002004030 हा टोल फ्री क्रमांक आहे.
या योजनेअंतर्गत हवामान घटकांच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान, पीक पेरणीपासून काढणी पर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट, स्थानिक नैसर्गिक आपत्ती, काढणी पश्चात नुकसान इत्यादी जोखिम बाबींचा खरीप 2024 करीता समावेश करण्यात आला आहे.
तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये सहभागी होण्याकरीता आपल्या नजिकच्या बँक शाखेत तसेच आपले सरकार सेवा केंद्रामध्ये विहीत मुदतीत विमा हप्ता भरुन सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी गोंदिया यांनी केले आहे. या योजनेबाबत अधिक माहितीसाठी क्षेत्रीय स्तरावरील मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी तसेच जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांच्या कार्यालयात संपर्क साधावा.

