अहेरी -अचानक प्रकृती खालावल्यानंतर वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने चार वर्षीय बालकाचा उपचाराअभावी मृत्यू झाला. आर्यन अंकित तलांडी (रा. कोरेली, ता. अहेरी) असे मृत बालकाचे नाव आहे. ही घटना २४ जून रोजीची असून तीन दिवसानंतर उघडकीस आली. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.अहेरी तालुक्यातील कोरेली या दुर्गम गावातील अंकित तलांडी न्यांचा मुलगा आर्यन याची २३ जून रोजी मध्यरात्री प्रकृती खालावली. पाच किमी लांब परमिली आरोग्य केंद्रात नेण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आर्यनवर प्राथमिक उपचार केले व पुढील उपचारासाठी अहेरी येथे नेण्यास सांगितले.
परंतु वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने पालक आर्यनला घेऊन बसने निघाले. वाटेत त्याची प्रकृती अधिक खालावली. बसचालक गौरव आमले यांनी बस थेट आलापल्ली आरोग्य केंद्रात नेली.परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. आरोग्य विभागाच्या ढिसाळ कार्यपद्धतीमुळे या भागात दरवर्षी अशा हृदयद्रावक घटना घडतात. पण, अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे व्यवस्थेत सुधारणा होण्याऐवजी अधिकच बिघाड होत असल्याचे चित्र आहे.
दुसरीकडे, अवजळ वाहतुकीमुळे परिसरातील रस्ते खराब झाले आहेत. त्यामुळे रुग्णांना उपचारासाठी चंद्रपूर, गडचिरोली जाण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागतो.