समीक्षण : ‘तारुण्याचे तरंग’ म्हणजे तरुणाईच्या प्रेमाचे प्रतिनिधित्व दिनेशकुमार अंबादे – निवेदक, गझलकार, कवी

0
112

२०१२ पासून सातत्याने संपर्कात असलेले आदर्श शिक्षक तथा कवी पालिकचंद बिसने यांचा तारुण्याचे तरंग हा दुसरा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. पहिल्याच भेटीत आपलेसे करून घेणारे हे व्यक्तिमत्व. त्यांनी मला काव्यसंग्रहाची ही खास भेट देत पुस्तकाच्या समीक्षेचा आग्रह धरला. त्यानिमित्ताने हे समीक्षण वाचकांसाठी उपलब्ध करून देत आहे.
प्रेममय जगता आले की, त्याला हिरवे स्वप्न दिसू लागते. अवती – भवतीचा परिसर स्वच्छंदी, मोकळा, सतेज भासतो. मन वाऱ्यावर गिरट्या घेऊ लागते. सभोवतालच्या घटना रंगीत दिसायला लागतात. कुणाला भवताल रंगीत दिसो अथवा न दिसो त्याला मात्र रंगीत दिसते. त्याच्या अंतर्मनात करुणेचा झरा पाझरू लागतो. हा करुणेचा झरा तो सतत अनुभवत असतो. इतरांना तो झरा दिसेल अथवा नाही परंतु; तो विविध प्रसंगातून अनुभवत असतो. त्याचे वागणे इतके सहेतुक होते की, त्याचे भावविश्व, अंतर्बाह्य मन प्रेमाने व्यापून टाकते. यातूनच ध्येय निश्चिती होते. अंतरी खुणगाठ बांधली जाते. यशाचे शिखर पदाक्रांत करायला सुरुवात होते. त्यासाठी होणारा जीवाचा आटापिटा सहन करण्याची आंतरिक शक्ती अथवा बळ शरीरात संचारते. इच्छित ध्येय प्राप्त होईपर्यंत हा प्रवास सातत्याने सुरूच असतो. हा प्रवास करणाऱ्या कवीचे नाव आहे पालिकचंद बिसने आणि त्याचा जिताजागता कवितासंग्रह म्हणजे ‘तारुण्याचे तरंग’. कवीचा ध्येयवेडेपणा पुढील ओळीतून संदर्भित होतो.
किती हुशार होतीस गं तू
गुणही तुझे सर्वात वर
ध्येय होते माझेही काही
सोडून म्हणशी वाऱ्यावर
शाळा कॉलेज मधील प्रेम पक्षी बनून उडू लागते. नव्हे; आकाशाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करते. “तुझ्यासाठी काय पण…” ही भावना ह्रदयस्त ठान मांडलेली असते. या प्रेमाने विविध अलंकारांचे आभूषण चढविलेले असते. विविध प्रतिमा नव्याने जन्म घेतात. आहे त्या प्रतिमांवर प्रेम शांत झाले तर; ते प्रेम कसले? जणू नाविन्याची ओढच प्रत्येक भेटीत, मिलनात, प्रसंगात जन्म घेते. त्यामुळे तारुण्यातील प्रेम विविध अंगाने बहरते, उमलते, फुलते. तिचे हसणे, तिचे बघणे, तिचे लाजणे, तिचे मागे वळून पाहणे सारेच कसे लोभसवाने वाटते. केवळ तिच्या येण्याची चाहूलही रोमांचकारी वाटते. अंगी प्रेमाचा बहर संचारतो. याची यथोचित प्रचिती ‘तुझ्याच दर्शनासाठी’, ‘पाहताच भाव विभोर’, ‘तुला पाहताच’ यामधून अचूक निशाणा साधते.
खऱ्या प्रेमाला उपमा नाही. प्रेम देवाघरचे देणे असे म्हटले जाते. प्रत्येक सजीवसृष्टीत प्रेममय भावना निसर्गनिर्मित असतेच. मानवी जीवनात सुद्धा ती जन्मतःच आहे. जीवन जगतांना प्रेमाचे स्वरूप जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर बदलत जाते. अर्थातच ते स्वरूप कधी वादळी, कधी समंजस, कधी ध्येयप्रद तर कधी उपदेशात्मक बनून व्यक्तीच्या व्यक्तित्वाला नाविन्यपूर्ण आकार देते. ह्या विषयीचा आढावा घेतल्याचे या काव्यसंग्रहाने सिद्ध केले आहे. कुमारावस्थेतील प्रेमाला शारीरिक आकर्षणाची किनार लाभते. तर युवकावस्थेतील किंवा प्रौढावस्थेतील प्रेम सचेत, समंजस असते. वरूणराजा धरेवर अवतरला की, तारुण्यातील प्रेमाला उधाण येते. पावसातील प्रेमाला पंख फुटून ते विविधांगी उडू लागते. पावसात मनसोक्त भिजते, विविध रूपक वापरून पावसाशी बोलण्याचा मोह आवरता येत नाही. पाऊस दोन जिवांच्या मिलनाचे कारणही ठरू शकते तर; काहींच्या भेटीचा तो साक्षीदार असतो. तरुणाईला पावसातील प्रेम अधिकच खुणावते. पाऊस बघून आठवणींना उजाळा येतो. पावसातील गाणी, कविता अलगद ओठांवर रेंगाळतात. याच अर्थाने पाऊस हा हवाहवासा वाटतो. पान जरी पिकत असले तरी ते पाऊस बघून हिरवे होते. काळाच्या ओघात पावसाचे स्वरूप बदलले तरीही गतकाळातील त्या प्रेमाच्या सुखद आठवणींच्या पाऊलखुणा प्रत्येकाच्या मन मंदिरात घर करून बसल्या असतात. हे नोंदवायला कवी विसरले नाहीत. पावसाळ्यातील पण भूतकाळातील प्रेममय अनुभूती ‘पावसा सांग ना’?, ‘पावसा तुझ्या श्रावणात’, ‘पावसात ये ना सखे’ या काव्यामधून तरुणाईच्या मनाची होत असलेली घालमेल स्वतः नायक बनून चपखल शब्दांत रचली आहे.
तरुणाईचे प्रेम म्हणजे केवळ आकर्षण नाही. तर सामाजिक बांधिलकी, ध्येय वाटा, दोन्ही नात्यातील अंतर याचाही मागोवा घेत ‘तारुण्याचे तरंग’ पुढे – पुढे मार्गक्रमण करते. ‘मर्यादा पण पाळत होतो…’, ‘शिक्षणाआधी लग्न ना करावे…’ , ‘दे लक्ष तू ध्येयाकडे’ , ‘नशीब बनव आधी’, ‘ध्येय गाठ मग लाव गळा’ यासारख्या रचनांमधील प्रेम सामाजिक बांधिलकी तर जपतेच परंतु; प्रेमाचा झरा आटू न देता यशाच्या अत्युच्य शिखरावर पोहोचते. खरं म्हणजे हे प्रेम समाज रचना टिकवून ठेवते, जीवनाकडे आषाळभूत नजरेने पाहते, संयमाने समोर जाते. या अर्थाने ‘तारुण्याचे तरंग’ तरुणांच्या गळ्यातील ताईत बनू पाहते. केवळ प्रेमाने पोट भरत नसले तरीही; प्रेम जगण्याचे बळ देते. ध्येयप्राप्तीची उर्मी अंगात भरते. तरुणपणाला प्रेमाची झालर चढवून समाजऋण फेडित, सामाजिक बंधने उभयंतावर लादून घेत ध्येयप्राप्तीनंतर एकत्र चालण्याची ग्वाही हा संग्रह देतो. ते पुढील काव्यपंक्ती मधून-
माझही बघणं फुकट
तुझं जागणं बेकार
नशीब बनवू आधी मित्रा
स्वप्न होतील साकार
हेच समंजस प्रेम माणसाला व्यसनांपासून कोसो दूर नेते. संयमाने जगण्यास शिकवते. अव्यवहार्य कृती पासून दूर ठेवते. माणसाला माणूस म्हणून जगण्यास, वागण्यास शिकवते. एकमेकांची काळजी घेण्यास भाग पाडते. अर्थातच आदर्शवत समाज रचना जन्माला घालण्याचे काम या निर्व्याज प्रेमाने केले. याचे प्रतिबिंब या काव्यसंग्रहातून उमटलेले आहे. प्रेम ध्येयाकडे घेऊन जाते. याचा अर्थ असा नाही की, रूक्ष वाटेवर एककल्ली ध्येयाकडे धावायला भाग पाडते तर; प्रेमाच्या सिंचनाने सदोदित हृदयात ओलावा कायम ठेवत यशाच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देते.
हा संग्रह जीवनाच्या उत्तरार्धातही घेऊन जातो. भूतकाळातील प्रेममय सुखाच्या आठवणींचे गाठोडे आता अधिकच सजग, समंजस झाल्याची जाणीव करून देते. जुन्या आठवणी आजही वार्धक्याकडे झुकू पाहणाऱ्या शरीराला तरुणपणाची आठवण देतात. वय वाढणं हे केवळ संख्यात्मक वाढ आहे. मात्र; सख्या तुझी आठवण हिरव्या जीवनाची चाहूल आहे. पवित्र प्रेमभावना इतिहासाची आठवण करून देतात. सीता, राम , रुक्मिणी, शंभू यांचे दाखले देऊन प्रेमाची शालिनीता, उच्च कोटीता नक्कीच वाढली. सरते शेवटी प्रेम कसे असावे किंवा नसावे यावरही हा संग्रह भाष्य करतो.
मुक्त छंद घेऊन हा संग्रह वाचकांच्या हाती आला आहे. व्याकरण, नेमक्याच प्रतिमा, काही अतिरंजीत शब्द योजना यामुळे जरी काव्य संग्रहाची काव्य उंची कमी वाटत असली तरीही काव्यातून मार्गदर्शन, सामाजिक जाण, यशाचा मार्ग, निष्कलंक प्रेम, निर्व्याज प्रेम,आशाळभूत जगणे, तत्त्वावर चालणे, उभयंतांची समज घेऊन ‘तारुण्याचे तरंग’ उभा असल्याने ‘वर्तमान तरुणाईच्या प्रेमाचे प्रतिनिधित्व’ हा संग्रह यथोचितच करतो आहे. म्हणून या काव्यसंग्रहाला खूप खूप शुभेच्छा. हा काव्यसंग्रह वाचकांच्या नक्कीच पचनी पडेल. हा आशावाद तसेच कवी पालिकचंद बिसने यांच्या पुढील लेखन कार्यासाठी हार्दिक मंगल कामना.

काव्यसंग्रहाचे नाव गोरेगा- तारुण्याचे तरंग
कवी- पालिकचंद बिसने
प्रकाशक – इंजी. गोवर्धन बिसेन, कुडवा, गोंदिया.
स्वागत मूल्य – १६५ रुपये

समीक्षक – दिनेशकुमार अंबादे, गोरेगाव.
भ्रमणध्वनी/ चलभाष ८२७५१४६६१८