मुख्यमंत्री वयोश्री योजना’ अंमलबजावणीसाठी शिबिराचे आयोजन

0
88

गोंदिया, दि.4 : मुख्यमंत्री वयोश्री योजनेची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी व योजनेचे अर्ज पात्र लाभार्थ्यांकडून भरून घेण्यासाठी ८ जुलै २०२४ रोजी सकाळी ११ वाजता सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हाधिकारी कार्यालयाचे मागे, पतंगा मैदान, गोंदिया येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त विनोद मोहतुरे यांनी केले आहे.

         राज्यातील ६५ वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने/उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मन:स्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र इत्यादींद्वारे त्यांचे मानसिक तथा कौटुंबीक स्वास्थ्य अबाधित ठेऊन वयोमानानुसार अनुकूल समाज निर्माण करण्यासाठी केंद्र पुरस्कृत योजनेच्या धर्तीवर राज्यात “मुख्यमंत्री वयोश्री योजना” राबविण्यास मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे.

         ३१ डिसेंबर २०२३ अखेरपर्यंत वयाची ६५ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेले व कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रु.२ लाखाच्या आत असलेले ज्येष्ठ नागरिक मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. सदर योजनेंतर्गत पात्र ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या शारीरिक असमर्थता व दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने/उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मन:स्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र इत्यादींद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणाकरिता एकवेळ एकरकमी 3 हजार रुपये पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट लाभ वितरण प्रणालीद्वारे प्रदान करण्यात येणार आहे.

        या योजनेकरिता राज्य शासनातर्फे १०० टक्के अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी व योजनेचे अर्ज पात्र लाभार्थ्यांकडून भरून घेण्यासाठी ८ जुलै २०२४ रोजी सकाळी ११ वाजता सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हाधिकारी कार्यालयाचे मागे, पतंगा मैदान, गोंदिया येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

        शिबिरात येताना टी.सी. किंवा जन्म प्रमाणपत्र, नावात बदल झाल्याचे शपथपत्र, उत्पन्नाचे स्वयंघोषणापत्र, आधार कार्ड, बीपीएल राशन कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स, बँक खात्याशी आधार लिंक असल्याचे प्रमाणपत्र व दोन पासपोर्ट साईज फोटो इत्यादी कागदपत्र सोबत आणावे. तसेच सविस्तर माहितीकरिता सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, गोंदिया येथे संपर्क साधून जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त विनोद मोहतुरे यांनी केले आहे.