आपत्ती निवारणासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज रहावे – जिल्हाधिकारी प्रजित नायर

0
575

 

  • संपर्क तुटणाऱ्या गावांची यादी करा
  • पुरेसा धान्य व औषध साठा ठेवा
  • सर्व विभागांनी समन्वय ठेवावा
  • एसओपी अद्ययावत करा
  • नियंत्रण कक्ष स्थापन करा

         गोंदिया, दि.11 : पावसाळा सुरू झाला असून पावसाचा जोर कधीही वाढू शकतो अशा परिस्थितीत प्रत्येक विभागाने दक्ष राहणे आवश्यक असून जिल्ह्यातील पुरप्रवण गावांचा सुक्ष्म आराखडा तयार करणे आवश्यक आहे. आपत्ती ही कधीही सांगून येत नसते. तयारी न करता ओढवलेल्या आपत्तीचे व्यवस्थापन करणे कठीण असते. पावसाळ्याच्या दिवसात अचानक पूर येणे, धरण फुटणे, रस्ता वाहून जाणे, गाव पाण्याखाली येणे अशा आपत्ती ओढवतात, त्यामुळे सर्व यंत्रणांनी आपत्ती निवारणासाठी सज्ज रहावे अशा सूचना जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी यंत्रणांना दिल्या.

         जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मान्सून तयारी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम, अप्पर जिल्हाधिकारी घनश्याम भुगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील, पूजा गायकवाड, अधिष्ठाता डॉ.कुसुमाकर घोरपडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

         जिल्ह्यातील जुने रस्ते, ईमारत, पूल, शासकीय इमारत, शाळा, महाविद्यालय, धरण व मामा तलाव इत्यादींचे संबंधित यंत्रणेने संरचना तपासणी (स्ट्रक्चरल ऑडीट) करून वापरण्यायोग्य असल्याचे प्रमाणपत्र देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे नदीक्षेत्र व पाणलोट क्षेत्रात असलेले अतिक्रमण तात्काळ काढण्याची कार्यवाही करावी असे जिल्हाधिकारी म्हणाले. प्रत्येक गावात फर्स्ट रिस्पॉन्स टीम तयार करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. मान्सून कालावधीत प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी नियंत्रण कक्ष स्थापन करून तो चोविस तास कार्यरत राहील याची खात्री करावी असे ते म्हणाले.

          गोंदिया जिल्ह्यात ९६ गावे पुरप्रवण असून या गावात विशेष उपाययोजना असलेला आराखडा तयार करावा. या गावांसाठी पर्यायी मार्गांची यादी तयार करावी. त्याचप्रमाणे पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या गावांची यादी तात्काळ सादर करावी. मान्सून तसेच आपत्तीच्या वेळेस कार्य प्रणालीची कार्यपद्धती अद्ययावत करावी असे त्यांनी सांगितले. तालुकानिहाय नियंत्रण कक्ष स्थापन करून नियंत्रण कक्षात पूर्ण कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. त्याचप्रमाणे नगरपालिका व ग्रामपंचायत स्तरावर आपत्ती व्यवस्थापन समिती गठीत करण्यात यावी. अनुभवी पोहणाऱ्या व्यक्तींची यादी सुद्धा अद्ययावत करण्यात यावी. या यादीत महसूल व पोलीस विभागातील अनुभवी कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात यावा. कार्यप्रणालीची प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) अद्ययावत करून आपत्ती व्यवस्थापन कक्षाला पाठविण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

         धरणाचे पाणी सोडतांना गावकऱ्यांना पूर्व सूचना देण्यात यावी. त्यासाठी दवंडी, सोशल मिडिया आदीचा वापर करण्यात यावा असे त्यांनी सांगितले. आपल्या कार्यक्षेत्रात सुरक्षीत निवारा, समाज भवन, शाळा, मंगल कार्यालय, लॉन, मोठ्या इमारती इत्यादींची ओळख करून त्या आरक्षीत करण्याबाबत कार्यवाही आताच करावी. विविध जलाशय, धरण, या ठिकाणी मान्सून कालावधीत सामान्य नागरिकांना जाण्यास प्रतिबंध करणारा आदेश निर्गमीत करावा असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

        नदी, नाल्यामधील गाळ काढणे, सफाई व स्वच्छता तातडीने करून घ्यावी. नदी, नाल्याच्या काठावर अतिक्रमण करणाऱ्यांना नोटीस देण्यात यावी. आपल्या जिल्ह्यात वैनगंगा व बाघ या महत्वाच्या नद्या असून या ठिकाणी संदेशवहन यंत्रणा अद्ययावत ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. नेमून दिलेली जबाबदारी प्रत्येक विभागाने पार पाडणे अनिवार्य असून मान्सून काळात आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी नियमीत संपर्क ठेवावा असे त्यांनी सांगितले. पूर ओसरल्यावर साथरोग वाढण्याची शक्यता असते, ही बाब लक्षात घेता आरोग्य विभागाने आतापासूनच नियोजन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक घ्यावी असे निर्देश दिले.

         पावसाळ्यात बस वाहून गेली, कार वाहून गेली, नागरिक पुरात अडकले व रेल्वे रुळावर पाणी साचले अशा घटना प्रत्येक वर्षी घडत असतात. हा जुना अनुभव लक्षात घेता या घटना घडणार नाहीत यासाठीच्या उपाययोजना आतापासूनच कराव्यात असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. मागील आपत्तीचा अनुभव व त्याचा अभ्यास करून उपाययोजना कराव्या असे ते म्हणाले. पूर परिस्थितीच्या काळात डोंगा उलटून जिवित हानी झाल्याच्या घटना घडतात ही बाब लक्षात घेता पुराच्या काळात डोंग्याला प्रतिबंध घालण्यात यावा असे त्यांनी सांगितले.

        पूर किंवा घटना घडल्यानंतर चोविस तासाच्या आत जिल्हाधिकारी कार्यालयाला माहिती देण्यात यावी. तालुकास्तरीय कंट्रोल रुम कार्यान्वित करावी तसेच सुरक्षित निवारा येथे मूलभूत सुविधा आहेत का याची खातरजमा करावी. सर्व यंत्रणांनी पूरपरिस्थिती व आपत्तीच्या काळात समन्वय ठेवून काम करावे तसेच दिलेल्या जबाबदारीचे गांभीर्याने पालन करावे अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर यांनी केल्या. संपर्क तुटणाऱ्या गावांना उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी भेटी देऊन नागरिकांना माहिती द्यावी असेही त्यांनी सांगितले.

Previous articleमहाराष्ट्र कृषी क्रांतीचा जनक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Next articleनारी शक्ती दूत ॲपवरून भरता येणार ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’चा अर्ज