जिल्हा प्रतिनिधी/सतीश पटले
मोहाडी तालुक्यातील आंधळगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या डोंगरगाव येथे शेतात रोवणी करीत असलेल्या महिलांवर वीज पडून दोन महिला मजुरांचा जागीच मृत्यू तर चार महिला गंभीर जखमी झाल्याची घटना आज दि. 15 जुलै रोजी सायं. 4 वाजताच्या सुमारास घडली. ज्ञानेश्वर वंजारी रा. डोंगरगाव, ता. मोहाडी असे शेतमालकाचे नाव असून त्यांच्या शेतात 17 महिला मजूर रोवणी करीत असताना अचानक मेघगर्जनेसह वीज कडाडली. यात कला सुकाजी गोखले वय 65 वर्षे व आशा सुरेश सोनकुसरे वय 56 वर्षे, रा. आंधळगाव या महिला मजुरांचा जागीच मृत्यू झाला तर रमा बंडू नीमजे वय 35, मैना पतिराम सोनकुसरे वय 60 रा. आंधळगाव, वंदना मधुकर जिभकाटे वय 45, निशा नाना वंजारी वय 35 रा. डोंगरगाव या महिला जखमी झाल्या असून उर्वरित 11 महिला मजूूर सुखरूप आहेत. दरम्यान गंभीर जखमी महिलांवर ग्रामीण रुग्णालय मोहाडी येथे उपचार सुरू आहे. सदर घटनेची बातमी पसरताच गावात स्मशान शांतता पसरली असून घटनेचा अधिक तपास मोहाडी पोलीस करीत आहेत.