एकदशीमागचे विज्ञान

0
405

         मन नेहमी इंद्रियांमागे धावत असते. इंद्रियांना शांत केले, तर मनही शांत होते. मन शांत झाले तर आपण अंतरात्म्यापर्यंत पोचू शकू, जेथे जिवा-शिवाचे मिलन होत असते. चातुर्मासाच्या काळात आपली आध्यात्मिक प्रगती कशी होईल याकडे थोडे लक्ष दिले, तर अंतरात्म्यापर्यंत पोचणे सुलभ होते.

अनेक जण आषाढी एकादशीची आतुरतेने वाट पाहत असतात, कारण या दिवसापासून आपल्याला उपासनेसाठी छान दिवस मिळतात. या एकादशीपासून पुढचे चार महिन्यांच्या कालावधीला म्हणजे कार्तिकी एकादशीपर्यंतच्या कालावधीला ‘चातुर्मास’ म्हणतात, खरे पाहता हा ‘चतुर्मास’ आहे कारण या कालावधीत आपले चातुर्य दाखविले नाही तर आपले जीवन सफल होऊ शकत नाही.

आषाढी एकादशीला ‘देवशयनी एकादशी’ असेही म्हणतात. भगवान या चार महिन्यांत झोप घेतात, असा एक समज आहे. भगवान चार महिने झोपत असतील हे पटते का? खरे तर, या चार महिन्यांमध्ये तर भगवंतांना अधिक काम पडत असावे. कारण हा काळ आहे पावसापाण्याचा. वेळेवर पाऊस येण्यासाठी त्यावर भगवंतांची नजर हवीच. याच काळात वर्षभराचे अन्नधान्य शेतीत उगवत असते. यावरही भगवंतांची नजर हवीच. आपण सगळे थकून भागून डाराडूर झोपतो तसे भगवंत झोपलेले नसतात, हे नक्की. भगवान या काळात योगनिद्रेत गेलेले असतात. योगनिद्रेच्या काळातही त्यांचे सर्व व्यवहार सुरू असतात. शेषावर पहुडलेले श्रीविष्णूंचे व त्यांचे पायाशी बसून पादाभ्यंग करणारी महालक्ष्मी असे समर्पक चित्र भारतात प्रचलित आहे.

एकादशीचे असाधारण महत्त्व

भारतात, विशेषतः महाराष्ट्रात, आषाढी एकादशीचे महत्त्व वाढविलेले आहे संतमहात्म्यांनी, श्रीज्ञानेश्वर माउली, श्रीतुकाराम महाराज आदींनी या एकादशीचे महत्त्व घराघरांत पोचविले आहे. आषाढी एकादशीच्या पूर्वी वारी असते. देहू व आळंदीहून श्रीतुकाराम महाराज व श्रीज्ञानेश्वर माउलींच्या पालख्या निघून मोठा जनसमुदाय वाजत-गाजत, विठ्ठल नामाचा गजर करत, चालत आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनासाठी पंढरपूरला जातात. वैकुंठाधिपती श्रीमहाविष्णू व श्रीमहालक्ष्मी हे श्रीविठ्ठल- रखुमाईच्या रूपात पंढरपुरात आहेत, अशी या वारकऱ्यांची श्रद्धा असते. पालखीच्या वारीत सहिष्णुतेचे, समभावाचे दर्शन होते. वारकरी एकमेकाला म्हणत असतात, ‘एक एका लागतील पायी रे’! वारकऱ्यांच्या या प्रचंड समुदायात कोणी छोटा नसतो, कोणी मोठा नसतो. सर्व जण मनात एकीभाव ठेवून वारीला निघतात, आणि परमात्म्याचे गुणगान करत विठूरायाच्या चरणी पोचतात. ते जेव्हा पांडुरंगाचे दर्शन घेतात तेव्हा त्यांच्या मनात वैकुंठाला पोचल्याचा आनंद असतो. अशा प्रकारे आषाढी एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे.

आपल्याला लक्षात ठेवण्याची एक गोष्ट म्हणजे योगनिद्रेत असलेल्या भगवंतांच्या दर्शनाला जायचे असेल तर काही अपेक्षा न घेता जायला हवे. एरवी आपण भगवंतांकडे अनेक मागण्या घेऊन जातोच. परंतु या चार महिन्यांत तरी भगवंतांकडे काही मागू नये. वारीला जाणाऱ्या भक्तांकडे पाहून ही गोष्ट लक्षात येते. हे सर्व वारकरी भगवंतांची स्तुती करत, नाचत, वाटेत मिळालेली मीठ- भाकरी खाऊन, वेळप्रसंगी पावसात भिजत आनंदाने भगवंतांच्या दर्शनाला जातात. आस असते फक्त विठ्ठलाच्या दर्शनाची, त्यांना काही मागायचे नसतेच. भगवंत योगनिद्रेत आहेत, ते काही वेगळे काम करत आहेत, त्यांना कशाला त्रास द्यायचा? हा भाव असतो.

व्रत वैकल्ये, उपवास का ?

आपल्या शरीरातील सर्व देवही या काळात विश्रांती घेत असतात, त्यामुळे या काळात जाठराग्नी कमी होतो, शरीरातल्या सर्वच संस्थांचे कार्य सुस्त होते. या काळात व्यायाम, योग वगैरे केले नाही तर नुसता चातुर्मास नव्हे; तर पुढचे सर्व वर्ष नीट जात नाही. एकादशीच्या उपवासाला नुसता धार्मिक नाही तर वैज्ञानिक अर्थही आहे. आपल्या शरीराची चेतासंस्था (नव्र्व्हस सिस्टिम) चालविणारी ती विष्णू देवता. अॅफरंट व इफरंट म्हणजे मेंदूकडे जाणाऱ्या व मेंदूकडे परत येणाऱ्या संवेदना हे वामन अवताराच्या कथेतील विष्णूपद आहे. मेंदूजलावर व पर्यायाने शक्तिकेंद्रावर चंद्रशक्तीचा परिणाम होताना दिसतो. आपणही या काळात आपली इंद्रिये अंतर्मुख करावीत. त्यांचे बाहेर फिरणे बंद ठेवावे. मन नेहमी इंद्रियांच्या मागे धावत असते. इंद्रियांना शांत केले तर मनही शांत होते. मन शांत झाले तर आपण आपल्या अंतरात्म्यापर्यंत पोचू शकू, जेथे जिवा-शिवाचे मिलन होत असते. चातुर्मासाच्या काळात आपली आध्यात्मिक प्रगती कशी होईल याकडे थोडे लक्ष दिले, तर अंतरात्म्यापर्यंत पोचणे सुलभ होते. तेव्हा निरपेक्ष साधना करावी.

सूर्य आपल्याला मदत करतो. पाणी आपल्याला जीवन देते. चातुर्मासातील ढगाळलेल्या वातावरणामुळे सूर्यापासून मिळणारी शक्ती कमी झालेली असते, या काळात सर्व देवता कमी शक्ती देत असल्याने ही आहे ‘देवशयनी एकादशी’, आणि असे आहे या एकादशीचे वैज्ञानिक माहात्म्य. म्हणून या चार महिन्यांमध्ये मेहनत घेणे, अधून मधून उपवास करणे आवश्यक असते.

ग्रीष्माचे काही आठवडे, वर्षा ऋतू आणि त्यानंतर येणारे पाच-सहा आठवडे मिळून पावसाळ्यात एकूणच शरीरात पित्ताचा संचय होतो. शरीरात पित्तप्रकोप होऊन पित्ताचे त्रास होऊ शकतात. तसेच पावसाळ्यात वाताचा त्रासही नक्कीच होतो. तेव्हा वात-पित्त एकत्र झाल्यावर शरीराला त्रास झाला तर नवल नाही. हा त्रास होऊ नये म्हणून या चातुर्मासाच्या कालावधीत अनेक व्रते आणि उपवास सांगितले आहेत. यातलीच एक आषाढी एकादशी.

गुरुपौर्णिमा, आत्मोन्नतीचा मार्ग

उपवासाला ‘आत्मवास’ असेही म्हणता येते. स्व-जवळ वा आत्म्याजवळ पोचण्यासाठी आपल्याला जे काही प्रयत्न करायचे आहेत ते करत असताना अन्न तयार करण्यात वेळ व अन्न पचविण्यात शक्ती खर्च होऊ नये, जडान्नाचे सेवन केल्यावर सुस्ती येऊ नये, यासाठी उपवास केला जातो. काही लोक चातुर्मासात वा एक पूर्ण महिनाभर एक भुक्त राहण्याचा नेम करतात. ऋषिमुनींनी, आपल्या वेदवाक्याने, भगवद्‌गीतेत आपल्याला शरीर, मन व आत्म्याची काळजी कशी घ्यायची याचे मार्गदर्शन केलेले आहे. शरीर कितीही धष्ट-पुष्ट असले तरी समृद्धी लागतेच. पैसा अडका, नातेवाईक असले तरी त्यांचा मैत्रीभाव, प्रेम व यापासून समाधान मिळणे आवश्यक असते. या सर्व स्तरांवर उन्नती हवी असेल तर आध्यात्मिकता, सेवा व प्रेम असणे आवश्यक आहे. हे सर्व भक्तीमुळे मिळते. एकादशी व चातुर्मास हा सेवा, प्रेम, भक्ती वाढविण्याचा, दानधर्म करण्याचा काळ. आषाढी एकादशीनंतर लगेच चार दिवसांनी गुरुपौर्णिमा येते, ज्या दिवशी गुरू आपल्याला एकूणच आत्मोन्नतीचा मार्ग दाखवतात. तेव्हा आषाढी एकादशीला ‘आत्मवास’ करावा. चातुर्मासात काही वेळ स्वसाठी दिला तर चातुर्मास आपणा सर्वांना सुखसमृद्धीचा, मैत्रीचा, आनंदाचा, प्रेमाचा जाईल, यात शंका नाही.

भगवंत हे स्वतः सत्यं, शिवं, सुन्दरम् आहेत. हेच सत्य, शिव व सुंदर आपल्या जीवनात यावे यासाठी या चातुर्मासाची, ज्याची सुरुवात आजच्या एकादशीपासून होते, योजना केलेली आहे, जेणेकरून आपल्याला अंतरात्म्यात वसलेल्या भगवंतांचे दर्शन होईल.

(श्रीगुरू डॉ, बालाजी तांबे यांच्या लेखन, व्याख्यानांतून संतुलन आयुर्वेदद्वारा संकलित.)

साभार:सकाळ वृतपत्र 17 जुलै2024

Previous articleमोहर्रम के उपलक्ष मे किया शरबत वितरण
Next articleवेध विधानसभा निवडणुकीचे….! अर्जुनीमोरगाव विधानसभा मतदार संघात हरीशकुमार बन्सोड यांच्या नावाची चर्चा….