‘त्या’ शिक्षिकेचा आकस्मिक मृत्यू की घातपात..? चौकशीची मागणी

0
2706

कवलेवाडा शाळेतील शिक्षिकेचा मृत्यू

मुख्याध्यापक चव्हाण यांची पोलिसांकडे तक्रार

तिरोडा / रमाकांत खोब्रागडे

तिरोडा तालुक्यातील कवलेवाडा येथील जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळेच्या शिक्षिका सुरेखा रहांगडाले यांचा शाळेत शाळा व्यवस्थापन समिती निर्माण करण्याकरिता बोलाविलेल्या पालकसभेत शुक्रवारी हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. दरम्यान, या प्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी करून दोषीवर कारवाई करावी, अशी तक्रार मुख्याध्यापक चव्हाण यांनी पोलिसांकडे दिली आहे.
पोलिसांनी शिक्षिकेचा मृतदेह ताब्यात घेऊन उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे शवविच्छेदनाकरिता आणला होता. संबंधित तक्रारीवर कारवाई करण्याची प्रक्रिया शुक्रवारी उशिरा रात्रीपर्यंत तिरोडा पोलिसांत सुरू होती.

१९ जुलै रोजी कवलेवाडा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत नवीन शाळा व्यवस्थापन समिती गठित करण्याच्या उद्देशाने आयोजित पालकसभेत शाळेच्या पदवीधर शिक्षिका सुरेखा महेंद्रनाथ रहांगडाले आवश्यक माहिती देत होत्या. – एवढ्यात बिलासंदर्भात एकाने वाद घातला आणि त्यांची प्रकृती बिघडली.

शिक्षिकेचे हृदयविकाराच्या धक्क्याने शाळेतच निधन

तिरोडा तालुक्यातील कवलेवाडा जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळेत १९ जुलै रोजी दुपारी दोनच्या दरम्यान शाळा व्यवस्थापन समितीची सभा सुरू असताना या सभेत मार्गदर्शन करीत असताना शिक्षिका सुरेखा महेंद्रनाथ रहांगडाले (सुरेखा रिनाइत) यांना अचानक छातीत दुखू लागले. त्यांना रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा शाळेतच मृत्यू झाला. त्यांच्या अकाली मृत्यूमुळे संपूर्ण तिरोडा शिक्षण विभाग व कवलेवाडा गावात शोककळा पसरली आहे. त्यांच्या मागे एक मुलगी व एक मुलगा असा परिवार आहे.

मुख्याध्यापकांनी लागलीच गावातील डॉक्टरांना शाळेत बोलावून शिक्षिकेला तपासले असता तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
या एकूणच प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी तक्रार शाळेचे मुख्याध्यापक राम चव्हाण यांनी शुक्रवारी सायंकाळी तिरोडा पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी शिक्षिकेचा मृतदेह त्यांच्या घरून ताब्यात घेतला व उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे शवविच्छेदनाकरिता आणला.रात्री 11 वाजता शवविच्छेदन प्रक्रिया झाली व शव नातेवाईकाच्या स्वाधीन केले.आज(ता.20) सकाळी 10.30 दरम्यान चंद्रभागा नाका स्मशान घाटावर अंतिम संस्कार करण्यात आले.
मुख्याध्यापकाने दिलेल्या तक्रारीनुसार हे प्रकरण चौकशीत ठेवतो.आणि शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करू असे तिरोडा पोलिसांनी सांगितले आहे.