तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्रात भाजपचा चेहरा कोण…???

0
987

भंडारा /सुनील तुरकर 

अवघ्या काही दिवसानंतर विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे.पावसाळा समाप्त होताच राज्यातील प्रमुख पक्ष उमेदवारांची जुळवा जुळव करणार आहेत.यावर्षी विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पक्षांतर झालेले आपल्याला पाहायला मिळेल यात काही शंका नाही.कारण विधानसभा निवडणुकीत इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. राज्यातील प्रमुख पक्षांची संख्या आता वाढली आहे. त्यामुळे सहाजिकच प्रत्येक पक्षातील कार्यकर्त्यांना आपण सुद्धा आमदार होऊ शकतो याची स्वप्न पडू लागली आहेत. आज आपण वेध विधानसभेचा या मालिकेत तुमसर मोहाडी या विधानसभा क्षेत्रातील भाजप पक्षाच्या बाबतीत चर्चा करणार आहोत. भाजप पक्षात प्रमुख दावेदार म्हणून मागील निवडणूक लढलेले प्रदीप पडोळे, माजी खासदार शिशुपाल पटले, आणि भाजपा किसान आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र पटले यांची नावे चर्चेत आहेत. याशिवाय मुन्ना पुंडे,के. के. पंचबुद्धे,निशिकांत ईलमे, विश्वनाथ बांडेबुचे ही सुद्धा मंडळी विधानसभेसाठी इच्छुक असल्याचे सांगितले जाते. प्रत्येकाने आपापल्या गॉडफादरमार्फत फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. परंतु मागील आठ दिवसापूर्वी माजी खासदार शिशुपाल पटले यांनी आपल्याच पक्षाला घरचा आहेर दाखवला. आणि भाजपच्या कार्यप्रणालीवर नाराजी व्यक्त करत त्यांनी प्रेस कॉन्फरन्स मध्ये आपली नाराजी व्यक्त करून दाखवली. त्यामुळे माजी खासदार शिशुपाल पटले दुसऱ्या पक्षाच्या मार्गावर तर नाही ना? याची कुजबुज विधानसभा क्षेत्रामध्ये लागली आहे. दुसरे म्हणजे प्रदीप पडोळे यांचा मागील निवडणुकीत दारुण पराभव झाला होता. भाजप पक्ष श्रेष्ठींच्या अगदी जवळचे असले आणि जात फॅक्टर त्यांना अनुकूल असला तरी सामान्य मतदारांपर्यंत त्यांचे नाव सक्षम उमेदवार म्हणून पोहचलेच नाहीं, हे कटूसत्य आहे. राहिली गोष्ट राजेंद्र पटले यांची तर यांना भाजप पक्षाने आतापर्यंत ‘टोपी’ दिली आहे. राजकारणात अतिशय दुर्दैवी माणूस म्हणजे राजेंद्र पटले अशी त्यांची या विधानसभा क्षेत्रात प्रतिमा झालेली आहे. मध्यंतरी त्यांनी पक्ष बदल केला व नंतर घर वापसी केली.अगदी सुरुवातीपासून शासकीय नोकरीचा त्याग करून त्यांनी भाजप पक्षाला पुढे नेण्याचा प्रयत्न केला. अनेक जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या परंतु त्यांचा भाजप पक्षात योग्य गॉडफादर नसल्यामुळे त्यांच्या नशिबी ‘राजयोग’ आला नाही. त्यांना विधानसभेची तिकीट मिळेल अशी आशा आहे. त्यासाठी त्यांनी अलीकडे पत्रकाच्या माध्यमातून आपली इच्छा सुद्धा व्यक्त केली आहे. भाजपा ने राजेंद्र पटले यांना जर टिकीट दिली तर ते दमदार उमेदवार ठरू शकतील. कारण सर्व पक्षांसी त्यांचे मधुर संबंध व शेतकऱ्यांसाठी झटणारा नेता,ग्रामीण भागातही त्यांची सर्वसामान्य मतदारांमध्ये ‘बिचारा राजेंद्र पटले’ अशी प्रतिमा आहे. शिवाय त्यांची स्वतःची विशेष वोट बँक आहे. भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये पोवार समाजाचे प्राबल्य आहे. जातीय समीकरणे पाहता. पोवार समाजाला तिरोडा विधानसभा क्षेत्रामध्ये भाजपकडून तिकीट दिली जाते. आणि त्याच कारणाने तुमसर विधानसभा क्षेत्रात ‘त्या’समाजाचा सक्षम उमेदवार असला तरीही त्याची तिकीट भाजपकडून कापले जाते असा आजवरचा इतिहास आहे.परंतु यावेळी मात्र भाजपने तिकीट वाटपाची ही आपली पारंपारिक पद्धत बंद केले तरच काही खरे….तुमसर मोहाडी या विधानसभेत महायुतीचे (अजित पवार गटाचे) राजू कारेमोरे हे विद्यमान आमदार आहेत. महायुतीत या विधानसभा क्षेत्रामध्ये राष्ट्रवादीची तिकीट भाजपा ला जाईल असे वाटत नाहीं. तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्रामध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. त्यातच माजी आमदार चरण वाघमारे यांची सुद्धा भूमिका महत्त्वाची राहणार आहे. महाविकास आघाडी च्या वाटेवर काही माजी खासदार,आमदार असल्याची चर्चाही रंगू लागल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेले मताधिक्य पाहता महायुतीचा उमेदवार हा दमदार असला तरच काही खरे अन्यथा पुन्हा एकदा महाविकास आघाडी या विधानसभा क्षेत्रात वरचढ राहील यात काही शंका नाही.

Previous articleविधायक महोदयजी सड़कोंपर गड्ढे ही गड्ढे ….कैसे जाए ?
Next articleधक्कादायक..! ‘या’ महामार्गाच्या उड्डान पुलावर मोठा भगदाड