लाडली बहीण योजनेला जिल्ह्यात उत्स्फुर्त प्रतिसाद

0
513

तीन लाखाच्या वर अर्ज प्राप्त

      गोंदिया : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ ही राज्य शासनाची महत्वाकांक्षी योजना असून गोंदिया जिल्ह्यात या योजनेला महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. सदर योजनेसाठी ग्रामीण भागात 1 लाख 57 हजार 942 ऑफलाईन व 1 लाख 76 हजार 428 ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले आहेत. आतापर्यंत एकूण 3 लाख 34 हजार 370 महिलांनी अर्ज भरले आहेत.

         जिल्ह्यात विविध ठिकाणी अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. आवश्यक कागदपत्रांविषयी महिलांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असलेल्या पात्र महिलांकडून अर्ज भरून घेतले जाणार आहेत. मात्र, पिवळे व केशरी रेशन कार्डधारकांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट मिळणार आहे. त्यानंतर पात्र महिलांच्या बँक खात्यावर जुलैपासून दरमहा दीड हजार रुपये लाभ जमा होणार आहे. या योजनेचा अर्ज ‘नारी शक्ती दूत’ या ॲपवरूनही भरता येणार आहे. अंगणवाडी व सेतू केंद्र तसेच तहसिल कार्यालयात येणाऱ्या महिलांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया 31 ऑगस्ट 2024 पर्यंत सुरुच राहणार आहे.

        राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी तसेच कुटूंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्यात ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’ सुरु करण्यात आली आहे. या योजनेत 21 ते 65 वर्ष वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये आर्थिक लाभ मिळणार आहे. यामध्ये विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परितक्त्या, निराधार आणि कुटुंबातील एका अविवाहीत महिलेला लाभ मिळणार आहे. या योजनेचा अर्ज ‘नारीशक्ती दूत’ या ॲपवरूनही भरता येणार आहे. सदर योजनेच्या नोंदणी साठी 31 ऑगस्ट पर्यंत मुदत आहे. वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे, मात्र पिवळे अथवा केशरी रेशनकार्ड असल्यास उत्पन्न प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. योजनेचा लाभ मिळण्यासाठी अधिवास प्रमाणपत्र/15 वर्षापूर्वीचे रेशनकार्ड/15 वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र/शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र/जन्म दाखला यापैकी एक दाखला ग्राह्य धरण्यात येईल. इतर राज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील पुरुषाबरोबर विवाह केला असल्यास पतीचे अधिवास प्रमाणपत्र/15 वर्षापूर्वीचे रेशनकार्ड/15 वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र/शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र/जन्म दाखला यापैकी एक दाखला ग्राह्य धरण्यात येणार आहे.

          ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ ही राज्य शासनाची महत्वाकांक्षी योजना असून या योजनेत पात्र महिलांना आर्थिक लाभ मिळणार आहे. योजनेत अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्ट 2024 पर्यंत आहे. या योजनेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांनी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी केले आहे.