गोंदिया, दि.2 : आदिवासी समाजाचे सांस्कृतिक वेगळेपणा, मानवतेबद्दल असिम श्रध्दा, निसर्गावर अतुलनीय प्रेम, प्रामाणिकपणाचे अत्युच्च टोक या पारंपारिक निखळ गुणांचा गौरव म्हणून दरवर्षी जागतिक स्तरावर 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. भारतातील समग्र आदिवासी समाजासाठी अस्मितेचा व आत्मसन्मानाचा हा दिवस आहे. केवळ भारतातच नाही तर जगाच्या सर्व भागात आदिवासी समाजाचे लोक मूळ निवासी म्हणून राहतात. त्यांची जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी, चालिरीती इत्यादी सामान्य लोकांपेक्षा भिन्न असतात. त्यांच्या शैक्षणिक सामाजिक उन्नतीसाठी आणि त्यांची संस्कृती जपण्यासाठी अनेक प्रकारचे कार्यक्रम शासनामार्फत राबविले जातात. या अनुसूचित जमातीचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी त्यांची संस्कृती जतन करण्यासाठी आदिवासी दिन साजरा केला जातो. या निमित्ताने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी अंतर्गत 9 ऑगस्ट 2024 जागतिक आदिवासी दिनानिमित्त “आदिवासी गौरव सप्ताह” आयोजित केला आहे.
या कार्यक्रमाअंतर्गत आदिवासी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी व आपली संस्कृती, कलाकौशल्य जपण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार 3 ऑगस्टला आश्रमशाळा व प्रकल्प स्तर वकृत्व स्पर्धा, 5 ऑगस्टला आश्रमशाळा व प्रकल्प स्तर चित्रकला स्पर्धा, 6 ऑगस्टला वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी वादविवाद स्पर्धा, 7 ऑगस्ट पासून ते तदनंतर निरंतर मुरकुडोह व इतर अतिदुर्गम ठिकाणी विविध शासकीय दाखले व योजनांचे शिबीर आयोजन, 8 ऑगस्टला आदिवासी समुदायाच्या विद्यार्थ्यांसाठी देवरी येथे बक्षिसात्मक स्पर्धा परिक्षा, 9 ऑगस्टला जागतिक आदिवासी दिनानिमीत्त प्रभात फेरी व कार्यालयीन कर्मचाऱ्यांमार्फत सर्वांसाठी रक्तदान शिबीराचे आयोजन. घरबसल्या आदिवासी समुदायाच्या लोकांना शासकीय योजना समजाव्यात यासाठी तयार केलेल्या Mobile App चे लोकार्पण. स्पर्धांमधील पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ.
तरी आदिवासी गौरव सप्ताह निमित्ताने जिल्हयातील सर्व आदिवासी विद्यार्थी/विद्यार्थीनींसाठी आयोजित स्पर्धांमध्ये व रक्तदान शिबीर व प्रभात फेरीमध्ये आपण सहभागी व्हावे, असे अवाहन प्रकल्प अधिकारी उमेश काशिद यांनी केले आहे.

