काही वर्षांपूर्वी काहीसा उच्चारायलाही कठीण वाटणारा सोसल मिडीया हा शब्द आज सर्वांच्या अंगवळणी पडलाय. तो इतका की, फेसबुक, द्विटर, व्हॉट्सॲप शिवाय अनेकांची सकाळ आणि संध्याकाळही होत नाही. सोसल मिडीयाने सर्व मानवी जीवन एवढं व्यापून टाकलय की त्याशिवाय माणूस आपल्या जीवनाची सध्यातरी कल्पनाच करू शकत नाही.
सोसल मीडीया ही आता चैनीची बाब न राहता गरजेची बाब बनत चालली आहे. अनेकांचे व्यवसाय, पोटपाणी सोसल मिडीयाच चालवतय. व्यक्तिपरत्वे त्याचा वेगवेगळा वापर केला जातोय. चांगल्या प्रवृत्तींनी त्याचा वापर चांगल्या कामासाठी तर वाईट प्रवृत्तींनी वाईट कामासाठी सोसल मिडीयाचा वापर केल्याचे आपल्याला जाणवते. त्यामुळे त्याचे बरेवाईट परिणाम समाजावर होताना आपल्याला बघायला मिळत आहेत.
सोसल मिडीयाचा दैनंदिन जिवनात एवढा प्रभाव वाढलाय की, दोन ओळींच्या एका द्विटवर अख्या अग्रलेख लिहीला जातोय. कोरोना काळापासून ऑनलाईन कार्यक्रम, मिटिंग यांचे प्रमाण वाढले आहेत. व्हिडीओ काॅलींगचे प्रमाण वाढले आहे. युट्युब चॅनेल्सच्या माध्यमातून ऑनलाईन प्रशिक्षण घेणे सोपे झाले आहे. याचे सारे श्रेय हे सोसल मिडीयाला जाते.
कोरोनाकाळात संपूर्ण जग घरात बंदिस्त झालं असताना या सोशल मिडीयानेच एकमेकांची आभासी भेट घडवून आणली. आरोग्याचे विशेष कार्यक्रम याच सोसल मिडीयाने घरोघरी पोहचवले. सोसल मिडीयाची उपयुक्तता बघून अनेक बहुराष्ट्र कंपन्याही आपल्या व्यवसायासाठी त्याचा वापर करून घेताना दिसतात. या आभासी दुनियेमुळे लांबच्या लोकांना एकमेकांच्या संपर्कात राहणे सहज सोपे झाले आहे.
सोसल मिडीयाच्या उपयुक्ततेमुळे त्याचा वापर मोठ्याप्रमाणात वाढला आहे. व्हाट्सॲपमुळे माहितीची तातडीने देवाणघेवाण करणे सहज शक्य झाले आहे. शहरी भागापासून ते ग्रामिण भागापर्यंत त्याचा प्रभाव बघायला मिळतो. त्यामुळे अनेक चांगल्या गोष्टी घडत असताना समाजातील अपप्रवृत्ती सोसल मिडीयाच्या माध्यमातून अनेक अमानवी कृत्य, हिंसाचार इत्यादी गोष्टींचा प्रसार करून माणसामाणसात हिंसा घडवण्याचा, लोकांमध्ये फूट पाडण्याचाही प्रयत्न करताना दिसत आहेत. व्हाट्सॲप, फेसबुकच्या माध्यमातून अनोळखी व्यक्तीला लिंक पाठवणे, त्यातून त्याच्या वैयक्तिक माहितीची चोरी करणे अशा घटना घडताना दिसत आहेत.
व्हाट्सॲपवर लिंक पाठवून त्याद्वारे बॅंक खात्यातून पैसे चोरी केल्याच्या घटना आपण आपल्या अवतीभवती बघितल्याच असतील. सोसल मिडीयाच्या माध्यमातून मैत्री करून आर्थिक फसवणूकीच्याही अनेक घटना घडत आहेत. देशविघातक शक्तींकडून देशात हिंसाचार घडवण्यासाठी सोसल मिडीयाचा वापर झाल्याचेही दिसून येते. त्यामुळे सोसल मिडीयाचा वापर करताना सर्वांनी सजग असणे गरजेचे आहे. सोसल मिडीयाही दुधारी तलवार आहे. आपली कोणत्याही प्रकारची फसवणूक होवू नये यासाठी तिचा डोळसपणे वापर करणे गरजेचे आहे.
– अविनाश जुमडे, सहाय्यक शिक्षक
जि. प. चंद्रपूर