मिशन आधार’ अंतर्गत आदिवासी विद्यार्थीनींना लॅपटॉप वाटप

0
459
1

      गोंदिया, दि.23 : “मिशन आधार” अंतर्गत कायद्याचे शिक्षण घेत असलेल्या आदिवासी विद्यार्थिनींना नागपूर येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच चंद्रशेखर बावनकुळे, आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त रवींद्र ठाकरे, उपायुक्त कुळमेथे, प्रकल्प अधिकारी देवरी उमेश काशीद तसेच मुलींचे पालक यांच्या उपस्थितीमध्ये लॅपटॉप सुपूर्द करण्यात आले.

          आदिवासी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास व्हावा, आर्थिक, सामाजिक विकास व्हावा यासाठी शासनाच्या विविध योजना आहेत, त्यातूनच प्रकल्प कार्यालयाकडून आयोजित  केलेल्या NEET/JEE/CLAT/NDA या अभ्यासक्रमाच्या प्रवेश पूर्व मार्गदर्शन वर्गाच्या माध्यमातून परीक्षा उत्तीर्ण होऊन दोन विद्यार्थिनींना नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी मध्ये प्रवेश मिळालेला होता.

        शिष्यवृत्ती व इतर बाबींची पूर्तता झालेने त्यांना त्याठिकाणी कायदयाची पदवी पूर्ण करण्यासाठी कोणतीच अडचण येणार नाही. परंतु सदर शैक्षणिक संस्थेमध्ये सर्व शैक्षणिक बाबी ऑनलाईन आयोजित होत असल्याने दोन विद्यार्थिनींना लॅपटॉपची आवश्यकता प्रकर्षाने भासत होती. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी कार्यालयामधील तत्कालीन प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांच्या संकल्पनेतून सुरु केलेला ” मिशन आधार” च्या माध्यमातून या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येणारे सर्व आश्रमशाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, वसतिगृहाचे गृहपाल, अनुदानित संस्थांचे संस्था चालक, प्रकल्प कार्यालयातील सर्व कर्मचारी व समाजातील इतर दानशूर आदिवासी व बिगर आदिवासी नागरिक यांनी दिलेल्या निधीतून संकलित झालेल्या रक्कमेतून कल्याणी बलदेव कोटवार, एकलव्य रेशिडेंशियल स्कूल बोरगाव/बाजार व खुशी रमेश वाढीवे,  शासकीय आश्रम शाळा जमाकुडो या दोन्ही शासकीय आश्रमशाळेतील अत्यंत बिकट परिस्थितीवर मात करून आलेल्या विद्यार्थिनींना महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी नागपूर येथे उच्च शिक्षण पूर्ण करीत असताना निश्चितच लॅपटॉपची मदत होईल.                             

         “मिशन आधार” अंतर्गत आपल्या सर्वांच्या एकीच्या ताकदीच्या बळावरती आज आपण दोन मुलींच्या शैक्षणिक भविष्यासाठी लॅपटॉप रुपी सहाय्य करू शकलो. नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी सारख्या उच्च दर्जाच्या शैक्षणिक संस्थेमधून निश्चित त्यांचे भविष्य उज्ज्वल होईल, पण या गरजेच्या क्षणी आपण सर्वांनी आप-आपल्या परीने जी आर्थिक मदत केली तिची मोल कधीच शब्दांमध्ये व्यक्त करणारी येणार नाही. देवरी प्रकल्पासाठी तसेच मिशन आधार ग्रुप मधील सर्व सदस्यांकरिता ही अत्यंत आनंदाची बाब आहे. यापुढे सुद्धा असेच समाजातील दानशूर व्यक्तींनी सहकार्य करावे तसेच अशी मदत करण्यास इच्छुक असलेल्या लोकांनी या कार्यालयाशी जोडले जावे. तसेच या मिशन आधार उपक्रमाशी जोडले जाण्यासाठी आपण लघुलेखक शिवाजी तोडकर, मोबाईल क्रमांक  9657709405 यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी यांच्या मार्फत करण्यात येत आहे.