वाघ नदीवरील पूल धोकादायक

0
1081
1

नवीन पुलासाठी निधी मंजूर करा; माजी आमदार नागपुरे यांची मागणी

सालेकसा / बाजीराव तरोने

आमगाव-सालेकसा राज्य महामार्गावरील वाघ नदीवर असलेला पूल धोकादायक झाला असून, आता या पुलावरून जड वाहतूक बंद करण्यात आली आहे. याचा थेट फटका संपूर्ण सालेकसा तालुक्यावर पडत आहे. नवीन पूल बांधण्याशिवाय दुसरा कोणताही उपाय नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ही बाब लक्षात घेऊन माजी आमदार भेरसिंह नागपुरे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली व नवीन फुलासाठी त्वरित निधी मंजूर करण्यात यावा, अशी मागणी करीत निवेदन दिले.

आमगाव-सालेकसा राज्य महामार्गावरील वाघ नदीवरील पूल जीर्ण आणि धोकादायक झाला आहे. त्यामुळे या मार्गावर मोठी वाहने तसेच बस सेवासुद्धा बंद झाली आहे. याचा फटका सालेकसा तालुक्यावर बसत असून सालेकसा तालुक्याची संपूर्ण बससेवा बंद झाली आहे.
नागरिकांसह विद्यार्थ्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

बसने प्रवास करणारे विद्यार्थी आणि महिला ऑटो रिक्षाने प्रवास करीत आहेत. पुलाजवळ बॅरिकेट्स लावून जड वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे सालेकसा तालुक्यात संपूर्ण बाजारपेठ प्रभावित झाली आहे. ही समस्या घेऊन तालुक्यातील नागरिकांनी माजी
आमदार भेरसिंह नागपुरे यांची भेट घेतली व वाघ नदीवर नवीन पूल निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी केली.

ही बाब गांभीर्याने लक्षात घेता माजी आमदार भेरसिंह नागपुरे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन नवीन पुलासाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी केली आहे.