गोंदिया : आमगाव-सालेकसा मार्गावरील बससेवा पूर्ववत करावी, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे,.
सालेकसा, आमगाव हे तालुके दुर्गम, नक्षलप्रभावित आदिवासीबहुल आहेत. या तालुक्यांमध्ये पाहिजे त्या प्रमाणात दळणवळणाची साधने नाहीत. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाद्वारे चालविण्यात येत असलेल्या बसेस येथील दळणवळणाचे प्रमुख माध्यम आहे.
दळणवळणाच्या कमतरतेमुळे या तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक तसेच तालुका व जिल्हास्थळी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो. वाघ नदीवरील पूल नादुरुस्त असल्यामुळे या मार्गावरून वाहनांची ये-जा बंद करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या गोंदिया आगारानेही सालेकसा आमगाव येथील मार्गावरील बसफेऱ्या बंद केल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाता येत नाही. परिणामी त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे हे नुकसान टाळण्यासाठी आमगाव-सालेकसा मार्गावरील बससेवा पूर्ववत करावी, अशी मागणी सभापती सविता पुराम यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून केली आहे.