उरकुडाभाऊ पारधी, मी आणि आमचा कँसर

0
201

मी, यवतमाळ येथे दि.15 मे 2006 ते 01जून 2008, त्यानंतर गडचिरोली येथे दि.02 जून 2008 ते 24 जून 2010 आणि तदनंतर पुन्हा दि.25 जून 2010 ते 28 फेब्रुवारी 2013 पर्यंत यवतमाळ येथेच महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचा जिल्हाप्रमुख म्हणून डीडीआर या राजपत्रित पदावर कार्यरत होतो. 28 फेब्रुवारी 2013 ला मी यवतमाळ येथूनच निवृत्त झालो व माझे जन्मगाव असलेल्या बोरकन्हार (ता.आमगांव, जि.गोंदिया, झाडीपट्टी) येथे पुनर्स्थायी झालो. म्हणजेच मी एकंदरीत सुमारे पाच वर्षे (दोन कार्यकाल) यवतमाळ येथील सपरिवार रहिवासी होतो.
माझ्या या यवतमाळ येथील दोन्ही कार्यकाळाची तुलना करता माझ्या एकूणच व्यक्तिमत्त्वात व प्रकृतीस्वास्थ्यात जमीन-आसमानाचा फरक पडलेला(?) होता, हे मला दोन्ही कालावधीत जाणणाऱ्या/पाहणाऱ्यांच्या नजरेतून सुटणे शक्यच नव्हते. याचे कारण म्हणजे मी गडचिरोली येथे बदलून गेल्यावर 26 सप्टेंबर 2008 ला माझा एक अपघात होऊन त्यात माझा डावा गुडघा तुटल्याने मला चालताना काठीचा आधार घ्यावा लागत असे. लगेचच 18 जानेवारी 2009 ला गडचिरोली येथेच माझा दुसरा मोठा/जीवघेणा अपघात होऊन माझा डावा हात उखडून पूर्णतः निकामी झाला. त्यासाठी पुणे येथील सुप्रसिद्ध संचेती हाॅस्पिटल येथील सुमारे सहा महिने उपचार घ्यावा लागला आणि डावा हात पट्ट्याद्वारे गळ्यात अडकवूनच ठेवावा लागे. (ही अवस्था पुढे डिसेंबर 2013 पर्यंत कायम ठेवावी लागली.)
दरम्यान 25 जून 2010 ला यवतमाळात पुन्हा बदलून आलो तेव्हा आता मी पूर्वीचा जसाचा तसा लखनसिंह कटरे न राहता डावा हात गळ्यात लटकवलेला व उजव्या हातात काठी, तरी हसतमुख(!) अशी माझी अवस्था होती. यानंतर लगेचच 26 ते 30 जुलै 2010 दरम्यान माझ्या किडनी कँसरच्या मैत्रीचे निदान झाले व 12 ते 22 ऑगस्ट 2010 दरम्यान नागपूर येथे मला माझी ती कँसरग्रस्त उजवी किडनी शस्त्रक्रिया करून काढावी लागली. या सर्व प्रक्रियेदरम्यान माझ्या दर्शनी व्यक्तिमत्त्वात व शारीरिक हालचालीत स्वाभाविक फरक पडला असला तरी माझा पूर्वीचा स्वभाव, हसतमुखपणा, निडरता, सहजता, जीवंतता सारख्या बाबींवर कोणताही विपरीत परिणाम मी जाणवू दिला नाही व पूर्वीसारखाच ”हर फिक्र को धुएँ में उड़ाता चला” या वृत्तीनेच जीवन जगत होतो. याला यवतमाळातील माझे सारे मित्रगण, अधिकारी/कर्मचारीगण, संस्थाचालक व त्यांचे कर्मचारीगण, आदि सर्व साक्षी आहेत.
उजवी किडनी कँसर-मित्राला देऊन टाकली असली तरी कँसरने मैत्री जपूनच ठेवल्याने त्यावरील पुढील रेडिएशन वगैरे व अन्य उपचार पुणे येथील रूबी हाॅल क्लिनिक येथील डाॅ.भूषण झाडे व त्यांची टीम यांच्या देखरेखीखाली सुरूच होते. दरम्यान चिखलदरा या थंड हवेसाठी सुप्रसिद्ध असलेल्या शहरातील एका जडीबुटी तज्ज्ञाबद्दल कळले की ते कँसर वर सुद्धा सफल उपचार करतात. मी त्यांच्याकडून सुद्धा दीर्घ उपचार करून घेतला. (आता ते हयात नाहीत, कोरोना-कालावधीत ते निसर्गशरण झालेत.) शिवाय होमहवन, मंत्रजाप या आध्यात्मिक व निसर्गोपचारप्रणित उपचार-क्रिया सुद्धा शास्त्रशुद्ध पद्धतीने आचरल्या. स्वतः कँसर स्पेशालिस्ट असूनही ज्यांना कँसरने घेरले व त्यातून ज्यांनी आपली यशस्वी सुटका(!) करून घेतली असे डाॅ.अरविंद बावडेकर यांचे “कँसर : माझा सांगाती” (मौज प्रकाशन) हे स्वानुभवाधारित पुस्तक वाचून मी सुद्धा किमोथेरपीला फाटा देऊन फक्त रेडिएशनचाच उपचार घेतला. कॅन्सररोधी कोणतेच एलोपॅथिक औषध घेतले नाही.
आणि अखेर जानेवारी-2013 ला खात्रीपूर्वक निदान झाले की कँसर ने आता माझ्याशी मैत्री तोडली. रूबी हाॅल क्लिनिक चे माझे संबंधित डाॅक्टरसुद्धा त्या चिखलदरा-वैद्याच्या आश्चर्यजनक वैद्यकीय कुशलतेने प्रभावित झाल्याचे स्पष्ट झाले.
याच दरम्यानच्या काळात “लाखात एक घडणाऱ्या वैद्यकीय गफलती” मुळे कँसरच्या उपचारादरम्यान माझ्या लहान आतडीला एक छिद्र पडले. मी खाल्लेल्या अन्नाची पेस्ट इंजेक्शनसाठी तेथे पडलेल्या छिद्रातून माझ्या कमरेच्या उजव्या बाजूने बाहेर पडू लागली. सततच्या गहन वैद्यकीय निदानप्रक्रियेनंतरच हे कारण कळले व त्यासाठी एक गंभीरतम शस्त्रक्रिया करून माझ्या लहान आतडीला पडलेले ते छिद्र बुजवण्यात यवतमाळचे डाॅ.अमोल देशपांडे सफल झाले. या शस्त्रक्रियेदरम्यान पंधरा दिवस मला अन्न आणि पाण्याच्या थेंबाशिवायही काढावे लागले. (देव असल्यास त्याला माझी प्रार्थना राहील की, बाबारे पाण्याशिवाय राहावे लागण्याची अशी भयंकर शिक्षा कोणालाही, चुकूनही देऊ नकोस.)
वर नमूद सर्व “स्मरण-चिन्हे” सावरून व सांभाळून मी सध्या वयाच्या एकोनसत्तर(69) वर्षानंतरही कार्यरत व ”हर फिक्र को धुएँ में उड़ाता चला” याच माझ्या ओरिजिनल वृत्तीने, न थांबता, वाटचाल करीत आहे. दोन वर्षांपूर्वी म्हणजे दि.19 मे 2022 ला यवतमाळच्या एक मित्राचा, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, यवतमाळचे निवृत्त जनरल मॅनेजर श्री.देवराव जीभकाटे यांचा, नेहमीप्रमाणेच फोन आला होता व त्यांनी त्यावेळेस गाजत असलेल्या “मा.श्री.शरद पवार यांच्या कँसरविजया”शी माझ्या या कँसरविजया(!)ची तुलना करून मला माझ्या inbuilt स्वभावविशेषाचे स्मरण करून दिले. मित्रवर्य देवराव जीभकाटे यांचा माझ्याप्रती स्नेह आठवून मी पुनर्जागृत झालो.
आज दि.02 सप्टेंबर 2024 ला या घटनेचे पुनर्स्मरण होण्याचे कारण म्हणजे काल दि.01.09.2024 ला प्रेस ट्रस्ट ऑफ गोंदियाच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित पुरस्कार प्रदान सोहळ्यात पुरस्कृत श्री उरकुडाभाऊ पारधी यांनी आयुर्वेदिक, निसर्गोपचार व आध्यात्मिक उपचाराने मात दिलेल्या कँसरविजयाचा विशेष उल्लेख. कँसरला न घाबरता यथायोग्य उपचार करून घेतले तर कँसरविजय शक्य आहे, ही बाब पुनश्च अधोरेखित झाली हे आणखी एक विशेष.
जय हो !!!

¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤
@ॲड.लखनसिंह कटरे,
बोरकन्हार-441902, जि.गोंदिया.
(02.09.2024)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Previous articleशाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पदी केवलचंद भाजीपाले यांची निवड
Next articleश्री स्वामी विवेकानन्द पब्लिक स्कूल में हर्षोल्लास के साथ मनाया गया तान्हा पोला