गोंदिया, दि.4 : आपल्या आजुबाजुला आपल्याला जर बालकामगार, बाल भिक्षेकरी, लैंगिक अत्याचार ग्रस्त बालके, हरवलेली बालके, सापडलेली बालके, सोडून दिलेली बालके, बालविवाह, संकटग्रस्त बालके आढळल्यास अशा बालकांना त्वरित आवश्यक मदत कुठून व कशी मिळवून देता येईल, याकरीता कुठे संपर्क करावा याबाबत सामान्य नागरिकांमध्ये संभ्रम असतो.
अशा संकटग्रस्त बालकांना त्वरित मदतीकरीता भारत सरकार, महिला व बाल विकास विभाग नवी दिल्ली व महाराष्ट्र शासन, महिला व बाल विकास विभाग यांच्यामार्फत 0 ते 18 वयोगटातील कोणत्याही प्रकारच्या अडचणी व संकटात सापडलेल्या तसेच काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या सर्व बालकांसाठी चाईल्ड हेल्प लाईन सेवा 1098 संपूर्ण महाराष्ट्रात कार्यान्वित आहे.
सदर सेवा अंतर्गत संकटग्रस्त बालकांना 24 बाय 7 हेल्पलाईन सेवा उपलब्ध आहे. सदर सेवेचा लाभ बालक स्वत: घेवू शकतो किंवा इतर कोणीही सदर सेवेद्वारे बालकांना मदत मिळवून देऊ शकतात. याद्वारे 1098 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करुन संकटग्रस्त बालकांना मदत करावी असे आवाहन महिला व बाल विकास विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी प्रजित नायर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तुषार पौनीकर यांनी केले आहे.
सदर तक्रारी विषयी जिल्हा बाल संरक्षण कक्ष, नविन प्रशासकीय इमारत, तिसरा माळा, रुम नं.36, जयस्तंभ चौक, गोंदिया येथे याबाबत माहिती देता येईल. माहिती देणाऱ्या व्यक्तीची शासन स्तरावर गोपनीयता ठेवण्यात येईल, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, गोंदिया यांनी कळविले आहे.