थकीत देयकाचा फटका : आमगांव,सालेकसा तालुक्यातील गावांचा समावेश
आमगांव : बनगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत आमगाव व सालेकसा तालुक्यांतील ३६ गावांचा पाणीपुरवठा केला जातो. या गावांचा पाणीपुरवठा २३ ऑगस्ट २०२४ पासून बंद करण्यात आला आहे. या योजनेत वीज बील देयक थकल्याने वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे पाणीपुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाअंतर्गत बनगाव पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहे.या गावांवर पाणीपट्टीचे १•५ कोटी रुपये थकित आहेत. ती रक्कम नळ कनेक्शन धारकांनी भरण्यासाठी ग्रामपंचयातने मोहीम चालविण्याची गरज आहे. ४४ लाख रुपये वीज बिल थकित असल्याने वीज वितरण कंपनीने वीज कनेक्शन कापले. उन्हाळ्यात पाणी पाजले त्याचे पैसे पावसाळा संपत असतानाही मिळाले नाही, ते कधी मिळतील? असा सवाल वीज वितरण कंपनीकडून होत आहे.
बनगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कधी वीजपुरवठा खंडित, कधी पाइपलाइनला गळती, कधी देखभाल दुरुस्तीचे कंपनीला पैसे दिले नाही, अशा विविध कारणांनी बंद राहते. या योजनेला अविरत सुरू ठेवण्यासाठी मोजक्याच लोकांचा आटापीटा असतो. त्यातच या योजनेचे शुद्ध पाणी घेणारे नळ कनेक्शनधारकही उदासीन आहेत. शुद्ध पाणी वापरतात, परंतु पाण्याचे बिल देण्यासाठी नळ कनेक्शनधारक धजावत नाही. परिणामी ३६ गावांवर दीड कोटी रुपये थकित आहेत.
वेळेवर बिलच देत नसल्याने होत नाही वसुली
पाणीपुरवठ्याचे बिल वेळेवर नगर परिषद व ग्रामपंचायतींना देत नसल्यामुळे थकित पैसे ग्रामपंचायत भरत नाही. नगर परिषदेला बिलच पोहचत नसल्यामुळे पैसे किती आणि केव्हा भरायचे हे कर्मचाऱ्यांना समजत नाही.त्यामुळे ही योजना राबविणाऱ्या योजनेच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालणे आवश्यक आहे.
४४ लाख रुपये थकित
बनगाव पाणीपुरवठा योजनेचे ४४ लाख रुपये थकित असल्यामुळे पाणीपुरवठा बंद करण्यात आला. या पाणीपुरवठ्याला सुरळीत करण्यासाठी जिल्हा परिषद पुढाकार घेत नाही. एकीकडे मोदी सरकारने जल स्वराज मिशन सुरू करून ‘हर घर नल, हर घर जल’ अशी मोहीम सुरू केली, परंतु सुरू असलेल्या या योजनेकडे भाजपची सत्ता असलेली जिल्हा परिषदच लक्ष देत नाही.
“विद्युत वितरण विभागाचा देय भरणा थकीत असल्याने बनगांव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना बंद आहे.आमगांव, सालेकसा तालुक्यातील ग्रामपंचायत व नगरपंचायत यांनी थकीत देय त्वरित भरणा करावा जेणेकरून पाणीपुरवठा सुरळीतपणे सुरु करण्यास मदत होईल.”
– आतीश सतदेवे,
उपविभागीय अभियंता, बनगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, आमगाव.“बनगांव पाणीपुरवठा योजनेचा वीज बिल थकीत असल्याने वरिष्ठाच्या आदेशानुसार तातपुरता विज प्रवाह खंडित करण्यात आला आहे.विज जोळणी वरिष्ठाचे आदेश मिळाल्यावर केली जाईल.”*
– सुमित पांडे,
उपकार्यकारी अभियंता ,म.रा.वि.म. सालेकसा.