गोंदिया,दि. 6: महाराष्ट्र शासन पर्यावरण विभाग निर्णय क्रमांक ध्वनी प्र.क्र. 12/08 दिनांक 5 सप्टेंबर 2016 अन्वये गणपती उत्सवा दरम्यान कायदा व सुव्यवस्था लक्षात घेऊन गोंदिया जिल्ह्यामध्ये चार दिवस सकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत अटी व शर्तीनुसार ध्वनीक्षेपक वाजविण्यास सूट जाहीर करण्यात आली आहे. ही सूट शांतता क्षेत्रात लागू राहणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी.
गणपती उत्सवा दरम्याचा दुसरा दिवस दिनांक 8 सप्टेंबर 2024, पाचवा दिवस 11 सप्टेंबर 2024, सहावा दिवस गौरी विसर्जन 12 सप्टेंबर 2024, अनंत चतुर्दशी 17 सप्टेंबर 2024 या दिवशी सूट देण्यात आली आहे. या दरम्यान गणेश उत्सव मंडळांनी पुढील अटी व शर्तीचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहे.
कलम 31 (1) (3) चे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी. सदर मिरवणूक देण्यात आलेल्या वेळेत सकाळी 6 वाजता सुरू होऊन रात्री 12.00 वाजता संपेल. मिरवणूकीचा मार्ग परवानगी घेतलेल्या मार्गानेच असून त्यात कोणताही बदल होणार नाही. मिरवणूक दरम्यान ध्वनीक्षेपक वापरा संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाचे पालन करावे तसेच इतर धार्मियांच्या प्रार्थनास्थळा जवळून जात असतांना ध्वनीक्षेपकाच्या आवाजामुळे जनतेस त्रास होणार नाही व आवाजाचे प्रदुषण होणार नाही याची दक्षता घ्यावी.
मिरवणूक करीता आयोजकांनी योग्य संख्येत स्वयंसेवक नियुक्त करून त्यांना पासेस वितरण करतील व नियुक्त केलेल्या स्वयंसेवकांच्या नावाची यादी संबंधित पोलीस स्टेशन देतील. कायदा व सुव्यवस्थेच्या संबंधाने मिरवणूक दरम्यान पोलीसांनी वेळोवेळी दिलेल्या सर्व सूचनांचे आयोजकांनी पालन करणे आवश्यक आहे. मिरवणूक दरम्यान विद्युत पुरवठा खंडीत झाल्यास पर्यायी प्रकाश योजना तयार ठेवतील मिरवणूक मध्ये वेडे इसम / दारूडे येवून काही अनुचित प्रकार करणार नाही याची आयोजकांनी दक्षता घ्यावी.
ध्वनीक्षेपकावर समयोचित वाद्या शिवाय उत्तेजक अश्लील, व्दीअर्थी गाणे, जातीवादी पुढाऱ्यांचे प्रक्षोभक भाषणाच्या टेम्स वाजवू नयेत. ज्यामुळे इतरांच्या भावना दुखावणार नाहीत तसेच तणाव निर्माण होण्यास प्रोत्साहन दिले जाणार नाही याची आयोजकांनी खबरदारी घ्यावी. रहदारीला अडथळा निर्माण होणार नाही याची आयोजकांनी दक्षता घ्यावी. कार्यक्रमात लाट्या, काठ्या व इतर अस्त्र-शस्त्र बाळगता येणार नाही. आवश्यक वाटल्यास व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सदर परवानगी कोणतीही पुर्वसूचना न देता रद्द करण्यात येईल याची आयोजकांनी नोंद घ्यावी. कार्यक्रमा दरम्यान कोणताही अनुचीत प्रकार घडून आल्यास आयोजकास सर्वस्वी जबाबदार धरण्यात येईल याची कृपया आयोजकांनी नोंद घ्यावी.
आयोजकांनी ध्वनी प्रदुषण नियम 2000 मधील नियम 3, 4 व 5 चे तंतोतंत पालन करण्यावे असे आदेश जिल्हादंडाधिकारी घनश्याम भूगावकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिले आहेत.