झाडीबोली : प्राचीनतम भाषा, व्याकरण, गीत-संगीत आणि सांस्कृतिक भौतिकवाद : एक संक्षिप्त आकलन

0
464
1

1)प्राचीनतम बोली/भाषेतून अत्याधुनिक/अद्ययावत संकल्पनांची मांडणी..

●झाडीबोलीच्या प्राचीनतम वारशाने आम्हाला भूतकाळाचे बंदीवान न होता भविष्यकाळासाठी झाडीबोलीचे भाषा-प्रवर्तक व्हावे लागेल.

●जुन्या संकल्पना, जुनी प्रतीके, जुने भाषिक प्रयोग यातून “प्रेरणा” घेऊन त्याद्वारे अत्याधुनिक/अद्ययावत संकल्पना, प्रतीके, भाषिक प्रयोग यांचा यथायोग्य वापर करून झाडीबोलीला “समयानुकूल” करावे लागेल.

●झाडीबोलीतील प्राचीनतम ते अद्ययावत शब्दांचा वापर आजच्या उजाखा* आणि सत्योत्तर युगाची संवेदना प्रकट करण्यासाठी सुद्धा करता येणे आवश्यक. फक्त बंसी वाजवत राहणे म्हणजे कूपमंडूक (कोठे-बंदिस्त) होणेच ठरेल.

●आज सर्वांनाच इंग्रजी हवी आहे. अशा विपरीत स्थितीत आपली झाडीबोली टिकविण्यासाठी आपापसातले सवतेसुभे टाळून व लकीर के फकीर ही वृत्ती टाळून बदलत्या काळाशी सुसंगत भाषिक-वृत्ती स्वीकारावी लागेल.

●झाडीबोलीच्या उत्थानासाठी अन्य कोणत्याही बोली/भाषेचा जरासाही विरोध वा दुस्वास न करता सहकार्य व सामंजस्याची भूमिका घेऊन सोबत चालण्याची वृत्ती सुद्धा जोपासावी लागेल.

●मातृभाषेतून शिक्षण घेणारी मुले/मुली ज्ञानात्मक — भावनात्मक दृष्टिकोनातून परभाषेत शिकणा-या मुलांपेक्षा उजवी ठरतात, हा संशोधकांचा इशारा कायम लक्षात ठेवूनच आपली भाषिक-वाटचाल करावी/ठरवावी लागेल.

2)व्याकरण आणि शुद्धाशुद्धता विचार/अविचार…~

●झाडीबोली, मराठी यांच्या वापरात व्याकरणविषयक नियम आदींचा उपयोग व वापर करताना आम्हाला भाषिक जीवाश्म होण्याचा अट्टाहास नसावा. आपले प्रत्यक्षातील जगणे व भवतालची अभिव्यक्ती चपखलपणे व्यक्त करू शकेल अशी आपली बोली–भाषा वापराची नैसर्गिक व सुलभ-सुकर अशी लवचिक पद्धती अवलंबावी लागेल.

●शुद्ध/अशुद्ध लेखन, प्रमाण भाषा/बोली भाषा यातील कृत्रिम व अतार्किक भेदादिंवर लक्ष/लक्ष्य केंद्रित न करता सुदृढ व सुकर अभिव्यक्तीसाठी भाषा/बोली, असे साधे सरळ सूत्र स्वीकारणे आम्हाला आवश्यक राहील.

3)भाषा आणि गीत-संगीत….

●मज्जासंस्थेच्या किंवा मेंदूच्या विकारांवर उपचार करणाऱ्या तज्ज्ञांच्या मते, मेंदूमध्ये भाषा आणि संगीत यांच्या आकलनाची दोन वेगवेगळी केंद्रे असतात : एका भागात भाषेची जाण आणि तर्कबुद्धी तर, दुसऱ्या स्मरणभागातील एका कप्प्यात संगीत लयींचे आलेख कोरलेले असतात.

●म्हणूनच “गाण्याचा तुटवडा” असणाऱ्या दुसऱ्या संस्कृतीतील लोकांच्या मनांपेक्षा भारतीय मन हे “अतिरिक्त गाण्यांना”ही तसेच भाषेच्या गारुडालाही प्रतिसाद देणारे आहे. हे विधान धाडसाचे वाटले तरी, ते सर्वसाधारण तर्काला व तद्विषयक ऐतिहासिकतेला धरून आहे.

●भारतातील वसाहतवादामुळे प्रत्येक तर्काधिष्ठित आणि सर्जन क्षेत्रात आपली अभिरुची बदलत गेली, पण भारतात संगीताची अभिरुची मात्र बहुतांशी तीच राहिली आणि आपण त्याच्याशी वसाहतवादी कालखंडात आणि नंतर सुद्धा निगडीत राहिलो. कारण आम्हा भारतीयांचे गीत-संगीताप्रती असलेले मेंदूतील ते सक्रीय केंद्र.

●मध्य पूर्व देशांतील अपवाद सोडला तर, चित्रपटांत गीत-संगीताचे बाहुल्य ही गोष्ट जगामध्ये इतरत्रच्या सिनेमा इतिहासात घडल्याचे आपणास दिसत नाही. असे गीत-संगीताचे बाहुल्य आपल्या भारतीय सिनेमाच्या इतिहासातच नव्हे तर आजही प्रामुख्याने आढळून येते. त्यामुळे गीत-संगीत हे भारतीय महासंस्कृतीचे खास वैशिष्ट्य, गुणविशेष असे अंग आहे, असे म्हटले तर यात फारसे वावगे वा चुकीचे नाही.

4)साहित्याकडून सांस्कृतिक अभ्यासाकडे…..

●सांस्कृतिक सौंदर्यमीमांसा, सांस्कृतिक कल्पनाशक्ती अशा अनेक संज्ञा प्रचलित झाल्या आहेत. परंतु सांस्कृतिक भौतिकवाद मात्र भारतीय साहित्याने अजूनही स्वीकारल्याचे दिसत नाही. संस्कृतीचे ऐहिक स्वरूप व त्याची भौतिकवादी मीमांसा करण्याची पद्धती भारतीय साहित्याला अजूनही अनोळखीच असल्याने आमची सम्यक, समग्र साहित्यिक दृष्टी सुद्धा विकसित होऊ शकलेली नाही.

●संपूर्ण जग “शुद्ध” साहित्याभ्यासाकडून सांस्कृतिक अभ्यासाकडे वळले आहे/वळत आहे. भारतात मात्र संस्कृत, संत, पुरातन वगैरे सनातनी परंपरेतील अभेद्य विद्यापीठेच स्थापन करण्याचीच चढाओढ सुरू आहे. वास्तविक पाहता यात परंपरा आणि नवता यांचा सुरम्य असा ऑर्गेनिक/सेंद्रिय संगम असणे क्रमप्राप्त ठरेल/ठरते.

●महाराष्ट्रात लोकसाहित्याची प्रयोगशाळा नाही. लोकसंस्कृती आणि अभिजात संस्कृतीबरोबर अद्ययावत नव्या संकल्पना व सिद्धांत जगभरातून जमा करून स्वतःच्या संस्कृतीची चिकित्सा करणे हा खरोखर अभिनव प्रयोग आहे. असा प्रयोग-प्रकल्प आता आम्हालाही, बोलीच्या अभ्यासकांनाही, हाती घ्यायला लागेल.

●पू.साने गुरुजी व इरावती कर्वे अथवा अन्य मान्यवर लोकसाहित्य संकलक यांचे त्या संदर्भातील व संबंधातील कार्य अतिशय महत्त्वाचे आहेच, परंतु त्या लोकसाहित्याची सांस्कृतिक दृष्ट्या चिकित्सा होणे ही बाब सुद्धा नक्कीच अपूर्व व वेगळी आहे. हे कार्य आता आम्हाला अग्रक्रमाने हाती घ्यायला हवे.

●साहित्याचे सुलभीकरण हे प्राथमिक स्वरूपात व प्राथमिक काळात आवश्यक असले तरी सतत, सदैव, नेहमीकरिता आम्ही सुलभीकरणालाच चिकटून राहू लागलो तर सुलभीकरण हे एक शापच ठरते/ठरेल. आणि सुलभीकरणाच्या या शापाचे महाभारत मोठे असून त्याची सैद्धांतिक मांडणी मात्र अद्ययावत नव्या संकल्पना व संज्ञा यांच्या दुष्काळात अडकून पडली आहे. यावर सुद्धा आता आम्हाला अग्रक्रमाने काम करावे लागेल.

●परंपरावादी लोक, सुलभीकरणातूनच अज्ञानाचे उत्पादन सतत वाढवत असतात. ते नव्या संकल्पना, संज्ञा आणि सिद्धांताला घाबरतात. आम्हाला ही “घाबरशाही” घालवण्यासाठी/उलथून टाकण्यासाठी झटावेच लागेल.

●गुहेतील मानवाच्या विकासात मानवशास्त्रज्ञांना सांस्कृतिक विकासात सारखे टप्पे आढळून आले/येतात. आजच्या भिन्न-भिन्न देशांच्या “संस्कृत्या” (CULTURES) या प्राचीन संस्कृती (CIVILIZATION) च्या फांद्या आहेत, हे आता सत्य/सिद्ध झाले असून त्यावरील अद्ययावत संशोधन याला पुष्टीच देत आहे. अशा या अद्ययावत साहित्यिक माहोलात आम्हाला आमच्या झाडीबोलीचे सांस्कृतिक भौतिकवादातून आकलन जगासमोर ठेवण्यासाठी/मांडण्यासाठी सुद्धा झटावेच लागेल.

●भाषेप्रमाणेच संस्कृतीच्याही चिन्हांचा अभ्यास आता केला जातो आणि त्यातूनच सांस्कृतिक भौतिकवादाचा उदय होतो/अभ्यास केला जातो — जो अजूनही आपल्याकडे दुर्लक्षित व अज्ञानाच्या भोवऱ्यातच अडकून आहे. या बाबींचा व बिंदूंचा सुद्धा आम्हाला आता गंभीरपणे विचार करावा लागेल.

(*उजाखा = उदारीकरण, जागतिकीकरण व खाजगीकरण)

(या टिपणासाठी ‘आपले वाङ्मय वृत्त’ मासिकाच्या डिसेंबर-2019 च्या अंकात प्रसिद्ध झालेल्या डाॅ.गणेश देवी यांच्या विचारांचा व आनंद पाटील यांच्या ‘साहित्याकडून सांस्कृतिक अभ्यासाकडे’ या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी नमूद कारणमीमांसा यांचा सुद्धा आधार घेतला आहे.)

□ (#795)

@ॲड.लखनसिंह कटरे,

(पूर्व सदस्य, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,मुंबई)

बोरकन्हार-441902, ता.आमगांव, जि.गोंदिया.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~