नागपुर : धनवटे महाविद्यालयात शिक्षक दिनाचा उत्सव मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष प्रसंगी, समाजातील विविध मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शहरातील सुप्रसिद्ध समाजसेवक आणि यशस्वी व्यवसायिक अभिषेक वर्धन सिंह उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. राजकुमारगिरी गोसावी होते. यासोबतच महाविद्यालयातील इतर मान्यवर प्रा. डॉ. डी. सी. वानखेडे, प्रा. डॉ. के. डी. मेघे, प्रा. नितीन कराले, प्रा. डॉ. एस. बी. वाल्के आणि प्रा. डॉ. के. के. आस्कर हे देखील प्रमुख्याने या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने झाली. नंतर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुमित ठाकरे यांनी आपल्या प्रभावी शैलीत सुरु केले. प्रस्तावना प्रेरणा पटले यांनी सादर केली.
या प्रसंगी विद्यार्थ्यांनी आपल्याशिक्षकांप्रती असलेली कृतज्ञता आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी भाषण केले. विद्यार्थिनी अमीषा पांडे, जिदन्यासा पेंडोर, आणि अंशिका पारधी यांनी आपल्या शब्दांत शिक्षकांप्रती असलेली भावना मांडली. त्यांच्या भाषणांमधून शिक्षकांच्या महत्वाची आणि विद्यार्थ्यांच्या जीवनावर होणाऱ्या त्यांच्या सकारात्मक प्रभावांची चर्चा करण्यात आली. प्रमुख पाहुणे अभिषेक वर्धन सिंह यांनी आपल्या भाषणादरम्यान महान शिक्षणतज्ज्ञ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या विचारांवर प्रकाश टाकला आणि त्यांचे भारतातील शिक्षण क्षेत्रातील योगदान सांगितले. त्यांनी शिक्षणाच्या महत्त्वावर भर देताना सांगितले की शिक्षक हा समाजाचा कणा असतो आणि त्यांच्यामुळेच देशाच्या भविष्यातील पिढ्या घडतात. त्याचबरोबर, भारतातील स्त्री शिक्षणाचे जनक सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांच्या कार्याचा उल्लेख करत त्यांनी स्त्री शिक्षणाच्या महत्त्वावर देखील जोर दिला. अभिषेक वर्धन सिंह यांनी सांगितले की, सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या विचारांनुसार, शिक्षण हे फक्त पुस्तकी ज्ञानावर मर्यादित नसावे, तर ते विद्यार्थ्यांच्या जीवनाच्या सर्व क्षेत्रात विकास घडवणारे असावे. त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले की आजच्या विद्यार्थ्यांनी फक्त शालेय किंवा महाविद्यालयीन शिक्षणावरच नव्हे, तर व्यावहारिक शिक्षणावर देखील लक्ष द्यावे. त्यांचे विचार प्रेरणादायी होते, ज्यामुळे उपस्थित विद्यार्थ्यांना शिक्षणाची व्यापकता समजली.कार्यक्रमात सहभागी झालेल्या इतर मान्यवरांनी देखील शिक्षकांच्या महत्त्वावर विचार मांडले. डॉ. राजकुमारगिरी गोसावी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, शिक्षक हा फक्त ज्ञान देणारा नसून, तो विद्यार्थ्यांना जीवनाची दिशा दाखवणारा असतो. त्यांनी शिक्षकांच्या निष्ठेचे महत्त्व अधोरेखित करत त्यांच्या विद्यार्थ्यांवर असलेल्या जबाबदारीबद्दल विचार मांडले.या उत्सवात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम देखील सादर केले. विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी गाणी, कविता आणि नृत्य सादर करून त्यांना आदरांजली अर्पण केली. विद्यार्थ्यांनी सादर केलेले कार्यक्रम शिक्षकांसाठी एक भावनिक क्षण होते. कार्यक्रमाची सांगता तनु हिंगनेकर यांच्या आभार प्रदर्शनाने झाली. त्यांनी उपस्थित मान्यवर, शिक्षक, आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले आणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी दिलेल्या योगदानाचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक रवी गुंडे, मुस्कान महतो, आदेश मारापे ,खुशाली मेश्राम , सेजल शेंडे, खुशी दूरुगकर, प्रेरणा पटले , राहुल निमजे , तनु हींगणेकर , पारूल ठाकूर , सिद्धार्थ बंसोड, अंश सोनी , अमिषा पांडे , स्वाती भारती, तनुश्री कामडी, मयविष वाघाडे, लावण्या राऊत आणि इतर विद्यार्थ्यांनी व शिक्षकानी महत्त्वाचे सहकार्य केले. धनवटे महाविद्यालयात साजरा झालेला शिक्षक दिनाचा हा उत्सव एक संस्मरणीय क्षण ठरला. विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांप्रती असलेली कृतज्ञता आणि प्रेम व्यक्त करत या विशेष दिवसाला एक वेगळे महत्त्व प्राप्त केले.

