पर्यावरण पूरक गौरी विसर्जनासाठी एकवटली नारीशक्ती!
भजेपार येथे शेकडो गौरींचे इको फ्रेंडली विसर्जन!
सालेकसा:बाजीराव तरोने
तालुक्यातील भजेपार येथे ग्राम पंचायतीच्या पुढाकाराने शेकडो गौरींचे इको फ्रेंडली विसर्जन करण्यात आले. “आम्ही जागरूक महिला,करू ‘इको फ्रेंडली’ हरितालिका” हा संकल्प घेत महिलांनी एकोप्याने ‘कृत्रिम गौरी विसर्जन कुंडात’ गौरी विसर्जित करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. दरम्यान पर्यावरण संवर्धनासाठी नारी शक्ती एकवटल्याची प्रचिती आली.
माझी वसुंधरा अभियानांतर्गत पंच तत्वाच्या रक्षणासह पर्यावरण संवर्धनासाठी भजेपार येथे प्रत्येक सण उत्सव पर्यावरण पूरक करण्याचा प्रयत्न केला जात आहे. नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने पर्यावरण पूरक सण उत्सव करण्याची जणू लोकचळवळ उभी झाल्याचे जाणवत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज चौक भजेपार, हनुमान चौक नदीटोला आणि माताबोडी परिसर, माताटोला अशा तिन ठिकाणी कृत्रिम गौरी विसर्जन कुंड तयार करून ग्रामपंचायतीने गावातील महिला व युवतींना ‘इको फ्रेंडली’ गौरी विसर्जन करण्याचे आवाहन केले. या आवाहनाला गावातील महिला, युवती आणि गावकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. भक्तिमय वातावरणात संपूर्ण गावातील महिला व युवती आपापल्या गौरी घेऊन नियोजित ठिकाणी पोहचल्या. भक्तिमय वातावरणात सामुहिक आरती, पूजा अर्चना झाल्यानंतर प्रत्येकाच्या घरून आलेला प्रसाद एकत्र करून सर्वांना वितरण करण्यात आले. यामुळे एकतेची भावना वाढीस लागण्यास मदत मिळाली. जल प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी निर्माल्य संकलन करून त्याचा वापर जैविक खत निर्मितीसाठी केला जात आहे.या पूर्वी जन्माष्टमी देखील याच पद्धतीने साजरी झाली असून पुढे इको फ्रेंडली गणेशोत्सवासाठी गावकरी सज्ज झाले आहेत. सरपंच चंद्रकुमार बहेकार यांच्या पुढाकारातून उभारलेल्या पर्यावरण पूरक गौरी विसर्जन उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी उपसरपंच कुंदा ब्राह्मणकर, ग्राम पंचायत सदस्य रवीशंकर बहेकार, रेवतचंद बहेकार, राजेश बहेकार, मनीषा चुटे, सरस्वता भलावी, आशा शेंडे, आत्माराम मेंढे, ममता शिवणकर, रोजगार सेवक गोपाल मेंढे, संगणक परिचालक अखिलेश बहेकार, कर्मचारी अतुल मेंढे, अमित ब्राह्मणकर, दागो फुन्ने आदींनी परिश्रम घेतले. या उपक्रमाला महात्मा गांधी तंटामुक्त समिती, शाळा व्यवस्थापन समिती, अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ,स्वामी विवेकानंद अध्ययन कक्ष, भजेपार शिक्षण कल्याण संघ, चौरागड आश्रम समिती, सूर्योदय क्रीडा मंडळ, सर्व महिला पुरुष बचत गटासह संपूर्ण गावकऱ्यांचे सहकार्य लाभले.