अहेरी /अमोल कोलपाकवार
राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार गट) शिवस्वराज्य यात्रा आज १२ सप्टेंबरला अहेरीत दाखल झाली. यावेळी झालेल्या मेळाव्यात भाग्यश्री आत्राम (हलगेकर) यांनी पक्ष प्रवेश केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार अनिल देशमुख, आमदार सुनील भुसारा, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, राष्ट्रवादी महिला आघाडी विभागीय अध्यक्षा शाहीन हकीम, जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार, जिल्हा नियोजन समिती सदस्य ऋतुराज हलगेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य ऋषी पोरतेट आदी उपस्थित होते. आई स्व. स्नेहादेवी तसेच वडील व मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना चरणस्पर्श करते, असा उल्लेख करून भाग्यश्री आत्राम भावूक झाल्या. आपल्या भाषणात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटात हे कार्यकर्त्यांच्या भल्यासाठी येत असल्याचा त्यांनी खुलासा केला. आतापर्यंत अहेरी विधानसभा क्षेत्राचा कोणताही विकास झाला नाही. सामान्य माणसाच्या अनेक समस्या आहेत परंतु त्या अजूनही पूर्ण झाल्या नाही. विविध समस्या त्या तर रस्त्यांची बेरोजगारीची समस्या दूर करण्यासाठी विद्यमान सरकार हे अपयशी ठरले आहे असा घनाघात त्यांनी यावेळेस सरकार वर केला. माझ्या कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या जात आहेत, पण कोणाला हात लावला तर गाठ माझ्याशी, असा इशाराही त्यांनी दिला. मैदान जवळच आहे. मीच चौका मारणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार अनिल देशमुख, महेबुब शेख, सुनील गव्हाणे, अतुल गण्यारपवार आदींची भाषणे झाली.शरद पवार यांनी घर फोडल्याच्या मंत्री धर्मरावबाबांच्या आरोपाला भाग्यश्री आत्राम यांनी उत्तर दिले. त्या म्हणाल्या, त्यांनी घर फोडले नाही, मी स्वतःच त्यांना तीनवेळा भेटले. धर्मरावबाबा आत्राम यांचे १९९० मध्ये नक्षलवाद्यांनी अपहरण केले होते. तेंव्हा शरद पवार यांनी प्रयत्न करून सुटका केली होती. हे उपकार कधी विसरता येणार नाहीत.. आता मी त्यांच्या पक्षात काम करून हे ऋण फेडणार आहे, असे त्या म्हणाल्या. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपण सदैव भाग्यश्रीताई आत्राम यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याची ग्वाही दिली. तर आमदार अनिल देशमुख यांनी या विधानसभा क्षेत्रात भाग्यश्री आत्राम यांना सर्वांनी आशीर्वाद द्यावा असे जनतेला आवाहन केले. सदर मेळाव्याला अहेरी भामरागड मुलचेरा एटापल्ली भागातील हजारो कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती.

