रस्त्याच्या मधोमध मोकाट जनावरांचा ठिय्या

0
920
1

➡️ आमगांव शहरातील प्रकार; अपघाताची शक्यता अधिक…

धनराज भगत/न्यूजप्रभात

आमगांव : शहरातील मुख्य मार्गांवर मोकाट जनावरांचा ठिय्या राहत असल्याने वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. इतकेच नव्हे, तर अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
शहरातील ठिकठिकाणी रस्त्यावर मोकाट जनावरांचा ठिय्या असतो. अनेक भागात दिवसभरात रस्त्यावर जनावरांचा वावर राहत असल्याने वाहतूक प्रभावित होत आहे. १० ते १२ च्या संख्येने जनावरे रस्त्यावर ठाण मांडून बसतात. त्यामुळे प्रवासी आणि अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. जनावरांचा मुक्त संचार ऐन गोंदिया – देवरी महामार्गावर वाढत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. सद्यःस्थितीत शहरात झालेल्या पावसामुळे खुल्या भूखंडांतर कोरडी जागा नसल्याने जनावरे मुख्य रस्त्यावर बसत आहेत. अनेकदा आंबेडकर चौक, संत जगनाळे चौक,मानकर गुरुजी चौक, गांधी चौक, कामठा चौक, नटराज मार्ग इत्यादी प्रमुख चौकातही जनावरांचा ठिय्या पाहायला मिळत आहे. त्यामुळे रहदारीस अडथळा होत आहे. रस्त्यांवर रुग्णवाहिकांची वर्दळ असते. अनेकदा मोकाट जनावरांमुळे रुग्णवाहिकांना अडथळा निर्माण होताना दिसतो. शिवाय शालेय लहान विद्यार्थ्याना त्रास सहन करावा लागतो. शाळा परिसरातही मोकाट जनावरांचा संचार वाढल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.
मोकाट जनावरांची व्यवस्था व्हावी
मोकाट जनावरांची मोकाट जनावरांची व्यवस्था करण्याची जबाबदारी ही स्थानिक स्वराज्य संस्थांची असते. या संस्थांनी सार्वजनिक ठिकाणी मोकाट फिरणाऱ्या जनावरांची सुरक्षितता, नियंत्रण आणि त्यांची देखरेख करणे आवश्यक असते. जनावरांमुळे सार्वजनिक आरोग्य किंवा वाहतुकीला धोका निर्माण होण्याची शक्यता असेल, तर त्यांची योग्य ती व्यवस्था करणे हे स्थानिक प्रशासनाचे कर्तव्य असते. नगर परिषदेचे मुख्याधिकारी / प्रशासक मोकाट जनावरांची व्यवस्था करण्याकडे त्यांचे लक्ष नाही, असेच दिसते.
“नगर परिषद कार्यालयाकडून दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणार आहोत. ते सायंकाळी रस्त्यावर बसल्या मोकाट जनावरांना हाकलण्याचे काम करतील. दोन-चार दिवसांत आम्ही अडथळा निर्माण करणाऱ्या जनावरांना उचलण्याचे काम करणार आहोत. “
 – कु.करिश्मा वैद्य,
मुख्याधिकारी, नगर परिषद, आमगांव .