पूरपरिस्थीतीचा आढावा
मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही
गोंदिया : गोंदिया जिल्ह्यामध्ये मागील आठवडयात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हजारो हेक्टर पीके पाण्याखाली गेले हाता तोंडाशी आलेले पीक जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज पूरपरिस्थिती बाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ.प्रशांत पडोळे, जिल्हाधिकारी प्रजित नायर, मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानंथम, पोलीस अधीक्षक गोरख भामरे, निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे, माजी आमदार राजेंद्र जैन, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांचेसह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री आत्राम पुढे म्हणाले, गोंदिया जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरग्रस्थांना शासनाच्या नियमानुसार आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने मदत देण्यात येणार असून मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही असे त्यांनी सांगितले.
खासदार डॉ.प्रशांत पडोळे म्हणाले, अतिवृष्टीमुळे झालेल्या पूरग्रस्त भागाचे सर्वे करुन नुकसानग्रस्थांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
जिल्ह्यात मान्सून कालावधीत जून ते सप्टेंबर या चार महिन्यात 1220.03 मि.मी. पाऊत होतो. परंतु यावर्षी 15 सप्टेंबर 2024 पर्यंत 1274.1 मि.मी. पाऊस पडलेला आहे. म्हणजे एकूण पावसाचा 114.3 टक्के पाऊस झालेला आहे. गोंदिया जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सर्व आठही तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. या दरम्यान पाच व्यक्ती मृत झाले. 2089 घरांचे अंशत: तर 43 घरांचे पुर्णत: नुकसान झाले आहे. 518 गोठ्यांचे नुकसान झाले. लहान-मोठी एकूण 53 पशुहानी झाली आहे. अतिवृष्टीमुळे चार हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. प्रशासनातर्फे युध्द पातळीवर जिल्ह्यातील आठही तालुक्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची कार्यवाही सुरु असून पंचनामे झाल्यानंतर झालेल्या नुकसानीकरीता शासनास प्रस्ताव सादर करण्यात येणार व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरावत लवकर लाभ मिळवून देण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी सांगितले.
या दौऱ्यादरम्यान पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी पूरग्रस्त बिरसोला गावाला भेट देवून फुलचूर येथील रामेश्वर कॉलनीमधील इमारत कोसळलेल्या अग्रवाल कुटुंबियांकडे सांतवना भेट दिली.