पितृपक्ष विशेष : वडीलांचे नसणे – एक आकलन..!

0
108

पितृपक्ष विशेष : वडीलांचे नसणे – एक आकलन…!

दि.25 जानेवारी 2018, गुरूवारला दुपारी 01:32 वाजता माझे वडील श्री.मोहनभाऊ कटरे (1930-2018) हे वयाच्या 88व्या वर्षी वृद्धावस्थेमुळे हे जग सोडून गेले, निसर्गशरण झाले. माझे आजोबा श्री.उकनभाऊ पाटील ऑगस्ट 1948 मध्ये, एका तत्कालीन असाध्य अशा लागट रोगाच्या साथीत, अल्पवयातच वारले. तेव्हा माझ्या वडीलांचे वय फक्त 18 वर्षाचे होते. त्या वयातही त्यांनी कुटूंबाचा व सुमारे 60 एकर शेतीचा सारा कारभार व पसारा अगदी व्यवस्थितरीत्या सांभाळला.
त्यांच्या सोबतीला त्यावेळचे आमचे आवारी श्री.शिवलाल बडो कुंभरे हे आदिवासी गोंड समाजातील स्वामीनिष्ठ व्यक्ती होते. शिवाय रावजीबाबा आंबेडारे, मोडकूकाका चव्हाण, मंगरूबडो चव्हाण, भैय्यालालभाऊ कुंभरे, उरकुडाबाबा शरणागत, छगनमामा शरणागत, कुकसीबडो भोयर, वळगूबाबा येल्ले, बाबूलालमामा शरणागत, चुन्नीलालभाऊ सर्राटी, कारूभाऊ मेंढे, लोंढू(रूपचंद)भाऊ मेंढे, डोकूभाऊ नेवारे, गोंडूभाऊ नेवारे, फंदूभाऊ भूमके, तुकारामभाऊ भूमके, दयारामभाऊ भूमके, चिंधूभाऊ भूमके, फंदूभाऊ भूमके, मयारामबडो गौतम, डोमाकाका सहारे, बेनीमामा गौतम, चिंधू(भसकी) बडो सर्राटी, उकाबडो नेवारे (सेरकी), यासारखे जीवाभावाचे स्वामीनिष्ठ व कुटुंब-घटकासम सेवक-वजा-सहकारी सोबत होते. या सर्वांचा मिळून जणू एकच मोठा/संयुक्त कुटूंबच होता, माझ्या वडिलांचा गोतावळा.
अशा तत्कालीन बिकटतम परिस्थितीत माझ्या वडीलांनी सारा कारभार सांभाळला व या सर्वांच्या मदतीने चांगली सामाजिक, राजनैतिक, प्रशासनिक(पोलीस पाटील म्हणून 1950 ते 1990), सांस्कृतिक (पारंपारिक दंडार कार्याला सक्रिय मदत), आणि कौटुंबिक प्रगती साधली. आम्हा चौघाही भाऊ-बहिणींना आपापल्या जीवनात सुस्थापित होण्यासाठी शिक्षण व सुविद्य संस्काराचा चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. (यात आमच्या आईची, स्व.सौ.कमलाबाई कटरे (1931-2014) यांची भूमिका सुद्धा अत्यंत महत्त्वाची होती.) फक्त अठरा वर्षाच्या एवढ्या लहान वयापासून सुरूवात करताना त्यांनी त्यांच्या वडीलांची उणीव कशी काय भरून काढली असेल, याचे आज, ते नसताना, मला एक अनबूझ कोडेच वाटते.
त्या काळची नोकरचाकरांची कौटुंबिक स्वामीनिष्ठा व निस्वार्थ प्रेम/आपुलकी तथा मालकावरील तसाच अनभिषिक्त अधिकार/विश्वास, या बाबी साह्यभूत ठरल्यात, हे सत्य असले तरी अगदी तरूणपणी वडील गेल्यावरची मानसिक पोकळी त्यांनी कशी भरून काढली असावी, हे मला आजही अकल्पनीयच वाटते.
फक्त चौथ्या वर्गापर्यंत औपचारिक शिक्षण घेतलेल्या व अगदी तरूणपणी पोरके झालेल्या माझ्या वडीलांनी, श्री.मोहनभाऊ कटरे यांनी, केंद्रीय व राज्यस्तरीय राजकारणातील सर्वश्री अशोक मेहता, मनोहरभाई पटेल, नरेंद्र तिडके, नासिकराव तिरपूडे, ज्वालाप्रसाद दुबे सारख्या दिग्गजांशी दोस्ती केली व टिकवली सुद्धा. शिवाय गोंदिया व आमगांव येथील स्थानिक राजकारणी व काही स्वातंत्र्यसेनानी सर्वश्री सोहनलाल मिश्रा, मेवालाल चौधरी, केवलचंद जैन, छेदीलाल गुप्ता, जयपालसिंह गहरवार, गोपीकिशन अग्रवाल, गौरीशंकर असाटी, रामेश्वरलाल अग्रवाल, रिखीरामजी शर्मा, भालचंद्रभाऊ रहांगडाले, पी.डी.रहांगडाले, नारायणभाऊ बहेकार, दयारामभाऊ भक्तवर्ती, चुक्कनजी मिश्रा व त्यांचे बंधु रामण्णा मिश्रा, लक्ष्मणराव मानकर गुरुजी या सर्व भिन्नभिन्न मतावलंबी नेतेमंडळीशी जवळीक टिकवून ठेवली. आणि त्यांच्या त्यांच्या राजकारणात व समाजकारणात यथाशक्य सक्रिय हातभार लावला, मदत केली. पण त्यांच्यापैकी कोणाहीकडून कवडीचीही आर्थिक, राजकीय वा कसलीही मदत वा सवलत कधी मागितली वा स्वीकारली नाही. मुख्यतः तत्कालीन काॅन्ग्रेस पक्षाला त्यांनी फक्त “दिले”- “घेतले” काहीच नाही वा तशी अपेक्षाही बाळगली नाही. पण वयाच्या 80-81 व्या वर्षी काही कामानिमित्त गोंदियाला गेले असता एका स्वनामधन्य नेत्या(?)च्या कार्यकर्त्याला त्याच्या जन्मदिनी आशिर्वाद द्यायला सहजच पोचले तेव्हा मान्यवर समाजातील त्या कार्यकर्त्याने, त्याच्या समाजालाही मान्य नसलेल्या पद्धतीने, त्यांना रांगेत उभे केले होते, याचा त्यांना खूप विषाद होता.
इतकेच नव्हे तर आमगांव व गोंदिया येथील व्यापारी वर्गातील सर्वश्री गिरधारीलाल अग्रवाल, अमृतलाल माहेश्वरी, कुंजीलाल माहेश्वरी, मदनलाल भैय्याजी, राधाकिशन अग्रवाल, डोमाजी पाथोडे यासारख्या विविध वृत्तीच्या व प्रतीच्या व्यापारी व्यक्तींशी सुद्धा मित्रवत सहकार्य निभावले.
अशा माझ्या वडिलांच्या आवागमनाचे/प्रवासाचे मुख्य साधन म्हणजे त्यांची या संपूर्ण परिसरात सुप्रसिद्ध राहिलेली घोडागाडीच होती. त्यांना सायकल चालवता येत नव्हती व त्यांनी सायकल शिकून घेण्याचा मन लावून कधी प्रयत्न सुद्धा केला नाही. घोडागाडी हेच त्यांचे प्रवासाचे मुख्य साधन होते. आणि घोडागाडीवाले पाटील हीच त्यांची प्रमुख ओळख आमच्या परिसरात होऊन बसली होती.
त्यांच्या गेल्यावर गेले तीन-चार दिवस मी जी मानसिक अवस्था व मानसिक/भावनिक पोकळी अनुभवली आहे, ती मला शब्दांत व्यक्त करता येत नाही. अखेरची दीड-दोन वर्षे ते माझ्या लहान भावाकडेच रहायचे, तरी रोज सकाळी त्यांचे कडे जाऊन त्यांचे पाया पडताना मी त्यांना अक्षरशः गुदगुल्या करून हसवायचो आणि त्यांच्या आई-वडीलांच्या भूमिकेत त्यांना “दादी” म्हणायचो, तेव्हाचे त्यांचे भोबडे(दात पडल्याने) हास्य मला दिवसभराचे चैतन्य प्रदान करायचे. (माझी आजी स्व.तुरजाबाई कटरे (××××-1978) त्यांना लाडाने दादी म्हणायची!)
त्यांचे-माझे वैचारिक व राजकीय मतभेद आमच्या कुटूंबात, नातेवाईकांत, गावात व इतरत्र सुद्धा सगळ्यांना ठाऊक होते/आहेत; कधीकधी मी त्यासंदर्भात आक्रमक सुद्धा व्हायचो; पण त्यांच्यातील विचारनिष्ठा आणि मानसिक दृढतेची उंची मात्र माझ्या मनात सदैव कायम होती, आहे व पुढेही राहील.
“वडीलांचे जाणे” म्हणजे काय असते, हे माझ्या वयाच्या आजच्या 70 व्या वर्षी सुद्धा मी परिभाषित करण्यास, शब्दांकित करण्यास पूर्णतः असमर्थ आहे. त्यांच्या जाण्यामुळे जाणवणारी अनामिक पोकळी मात्र अजूनही माझ्या आसपास कायम आहे. अजूनही मला ती अनाकलनीय व अनामिक अशी पोकळी आकळता आलेली नाही/येत नाही किंवा ती पार करताही आलेली/येत नाही.

‘दि.18 सप्टेंबर 2024 पासून सुरू झालेल्या पितृपक्षाच्या निमित्ताने आज त्यांची स्मृती जागृत झाली आणि मनुष्य कोणत्याही वयात वडीलांसमोर बालकच असतो याची तीव्र जाणीव माझे अंतर्मन हालवून गेली.’
¤ (#750)
@ॲड.लखनसिंह कटरे,
बोरकन्हार-441902,
(जि.गोंदिया)/18 सप्टेंबर 2024.
****************************