एटापल्ली: अम्ब्रीशराव आत्रामांच्या ‘अहेरी विधानसभा क्षेत्रातील जनतेला खड्ड्यात टाकून मंत्री हेलिकॉप्टरने फिरत असल्याच्या’ टीकेला राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.तुम्हाला अहेरी विधानसभा क्षेत्रात समस्या दिसत असेल तर आजपर्यंत एकदाही रस्त्यावर न येता कुठे गायब झाले होते.गेली चार वर्षापासून तुमचा थांगपत्ता नव्हता. आज निवडणूका तोंडावर आले असतानाच समस्या कसे दिसत आहेत ? असा खोचक सवाल करत घरात बसून राहणाऱ्यांनी विकासावर बोलू नये अश्या शब्दात मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी अम्ब्रीशराव आत्रामांवर हल्लाबोल केला.एटापल्ली तालुक्यातील पीपली बुर्गी येथे आयोजित जनसंवाद व आढावा बैठक दरम्यान ते बोलत होते.
यावेळी सिनेट सदस्य तनुश्री आत्राम,माजी प स सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर,राकॉचे जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख,माजी जि.प.अध्यक्ष समय्या पसुला,माजी जि.प.सदस्य संजय चरडुके,माजी जि.प.सदस्य कत्तीवार,सरपंच मुन्ना पुंगाटी,गाव पाटील सैनुजी लेकामी,भूमिया डुंगा लेकामी,कचलेर चे गोटा पाटील,जवेलीचे मनोज तिम्मा,बुर्गीचे पाटील दिलीप नरोटे,हेटळकसाचे पाटील माधव लेकामी,कुदरीचे पाटील नांगसू तिम्मा,वेरमागडचे पाटील तोंदे कातवो,मोहूर्लीचे पाटील कोमटी गावडे,कोरणारचे पाटील बिरजू धुर्वा,ग्रा.प.सदस्य रेणू गावडे,कुंडुमचे पाटील कोमटी कोरसा, नैनवाडीचे पाटील श्रीनिवास मट्टामी,चैतु गोटा,निर्मला बाबुराव गोटा, चंदू तुमरेटी, कन्ना नरोटी आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना मी हेलिकॉप्टरने फिरून जास्तीत जास्त लोकांच्या संपर्कात आहे.मात्र, तुमच्याकडे आलेल्या लोकांना भेटायला तुम्हाला वेळ नाही.एकीकडे स्वतः कधी मतदारसंघात उपस्थित राहत नाही आणि वर्षातून एकदा कधी आले तर दिवसा कुणाला भेटत नाही.त्यामुळे अनेकांनी साथ सोडली. आता पुन्हा सक्रिय झाल्याचे दाखवीत आहेत. मात्र,जनता खूप हुशार आहे.तुमची जागा तुम्हाला नक्कीच दाखविणार आहे. आम्ही विकास कामांचा कधीच गवगवा केला नाही.अजूनही कोट्यवाधिंची कामे प्रगतीपथावर आहेत.पावसामुळे रस्त्यांची कामे थांबली होती.आता पूर्वव्रत सुरू झाले आहे.जो काम करतो त्याच्यासमोरच समस्या येतात.ज्या माणसाने कधी कामच केले नाही त्यांना समस्यांची काय जाणीव असेल.असा टोला देखील मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी लगावला. एवढेच नव्हेतर आघाडीतील काही लोक महायुतीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेबद्दल अपप्रचार करीत आहेत.ते गोरगरिबांना मिळणाऱ्या योजनांच्या विरोधात आहेत. त्यामुळे असे लोक गावात आले तर त्यांना योग्य धडा शिकवा असे आवाहन मंत्री आत्राम त्यांनी केले.
दरम्यान पीपली गावात आगमन होताच परिसरातील नागरिकांनी ढोल, ताशांच्या गजरात आणि पारंपरिक नृत्याने गावात रॅली काढत त्यांचे जल्लोषात स्वागत केले.कार्यक्रमात इतर मान्यवरांनी महायुतीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देऊन विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडण्याचे आवाहन केले.उपस्थित नागरिकांना मान्यवरांच्या हस्ते विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला.या कार्यक्रमात बुर्गी,पीपली, कचलेर,मोहूर्ली,जिजावंडी, जवेली, हेडरी,रेगादडी,वांगेतुरी, मवेली, कुदरी,कुंडुम,नैनवाडी, गणपहाडी, गडमागड,कुकेली, मानेवारा,कारका आदी गावातील हजारो नागरिक उपस्थित होते.