गोंदिया : जिल्हा सामान्य केटीएस रुग्णालय येथे २७ सप्टेंबर रोजी, जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या मार्गदर्शनात “इंटिग्रेटेड डिसीज कंट्रोल प्रोग्रॅम” (IDSP) अंतर्गत “विश्व रेबिज दिन” साजरा करण्यात आला. या दिवशी रेबिज जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात सार्वजनिक आरोग्य नर्सिंग अधिकारी निलू चुटे यांनी प्रास्ताविकाने केली. कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून डॉ. तृप्ती कटरे, डॉ. बी. डी. जयस्वाल, डॉ. सुवर्णा हुबेकर, पीएचएन रुपाली टोने, दीपाली वानखेडे आणि इतर प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी कार्यक्रमादरम्यान सांगितले की, सध्याच्या काळात कुत्रे पाळण्याची प्रवृत्ती वाढली आहे. अनेक लोकं कुत्र्यांना पाळतात, पण चावल्यावर काही वेळा त्याकडे दुर्लक्ष करतात. अशा वेळी रेबिजची लस घेणे अत्यावश्यक असते, कारण रेबिज एक लाइलाज आणि प्राणघातक आजार आहे. म्हणूनच लोकांमध्ये याबाबत जागरूकता निर्माण होणे आवश्यक आहे.
रेबिज म्हणजे काय ? : रेबिज हा एक व्हायरसजन्य आजार आहे, जो प्रामुख्याने संक्रमित प्राण्याच्या चावण्यामुळे पसरतो. योग्य वेळी लस न घेतल्यास रुग्णाचे प्राण धोक्यात येऊ शकतात.
विश्व रेबिज दिनाचा उद्देश: जागतिक आरोग्य संघटना प्रमाणे (WHO)दरवर्षी २७ सप्टेंबर रोजी “वर्ल्ड रेबिज डे” साजरा केला जातो. याचा उद्देश म्हणजे रेबिजमुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या कमी करणे व लोकांमध्ये जागरूकता वाढवणे. यावर्षी २०२४ ची थीम “ब्रेकिंग रेबिज बाउंड्रीज़” (Breaking Rabies Boundaries)ही आहे. यामधून हे संदेश दिला जातो की, रेबिजच्या आजाराच्या मर्यादा तोडून या आजारावर मात करणे गरजेचे आहे.डॉ.हुबेकर यांनी सांगितले की, सध्या “अँटी रेबिज इंजेक्शन” हे सर्व सरकारी रुग्णालयात मोफत उपलब्ध आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला बळी न पडता, कुत्रा चावल्यास त्वरित रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत.
उपरोक्त कार्यक्रमाचे संचालन नर्सिंग स्टाफ मिस नर्गिस अली यांनी केले, तर आभार प्रदर्शन अश्विनी उईके यांनी केले. उपस्थित रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना रेबिजविषयी माहिती देणारी पत्रके वाटप करण्यात आली. रेबिज प्रतिबंधक लस विषयी माहिती देतांना आणि जागरूकता वाढवण्यासाठी केलेल्या या अभियानाचा उद्देश, लोकांपर्यंत योग्य ती माहिती पोहोचवणे हा होता.