ज्येष्ठांनी खरं-खोटं ओळखण्याचं धाडस ठेवावं – ओम प्रकाश अग्रवाल

0
175
1

आमगाव : समाजात वावरताना खरे ते खरे आणि खोटे ते खोटे बोलण्याचे धाडस ज्येष्ठांनी ठेवावे, असे आवाहन ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यक्रमात अध्यक्ष ओम प्रकाश अग्रवाल यांनी केले. आमगावच्या वसंत नगर येथील हनुमान मंदिरात ज्येष्ठ नागरिक दिनाच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून सेवानिवृत्त प्राध्यापक श्रीमती देवयानी लोखंडे, सेवानिवृत्त प्राचार्य नरेंद्र शुक्ला, आणि मामा अग्रवाल उपस्थित होते. सर्व अतिथींनी हनुमानजी व सरस्वतीच्या छायाचित्राला माल्यार्पण करून पूजन केले.

कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ नागरिक संघाचे संतोष कटकवार यांनी प्रास्ताविकातून संघाच्या गेल्या दहा वर्षांतील कामगिरीवर प्रकाश टाकून केली.

समारंभात समाजातील सार्वजनिक जीवनात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. सन्मानित व्यक्तींमध्ये सेवानिवृत्त प्राचार्य रामचंद्र सूर्यवंशी, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख उपसराव पोचलवार, मोहम्मद इसाक शेख, वामन बारसे आणि गोंदिया जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक सदस्य रघुनाथ भुते यांचा समावेश होता. त्यांना शाल, श्रीफळ, आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाच्या निमित्ताने श्रीभाद्री यांनी देशभक्तीपर गीत सादर केले, तर प्राचार्य सोमवंशी व कळंबे यांनी गीतांची मनोरंजक प्रस्तुती दिली.

प्राचार्य व्ही. डी. मेश्राम यांनी ज्येष्ठांनी जीवनात आपली मर्यादा ओळखून वागण्याचे महत्त्व सांगितले. त्यांनी आमगावच्या मुख्य रस्त्यावर स्पीड ब्रेकरची मागणी केली, तसेच महिन्यातून एकदा ज्येष्ठांनी एकत्र येऊन विविध विषयांवर चर्चा करण्याचे सुचवले.

प्रमुख वक्त्या प्राचार्य देवयानी लोखंडे यांनी महाराष्ट्र आणि भारत सरकारच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती देऊन, ज्येष्ठ नागरिकांनी सजग राहावे असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे संचालन शिक्षक विनायक अंजनकर यांनी केले. पसायदान बाळू धवडे यांनी सादर केले आणि कार्यक्रमाचे आभार प्राचार्य व्ही. डी. मेश्राम यांनी मानले.

 

Previous articleज्येष्ठ नागरिकांचे अनुभव समाजासाठी अमूल्य – माजी आमदार राजेंद्र जैन
Next articleमा.भुवन साखरे यांची आझाद समाज पार्टीच्या जिल्हा अध्यक्ष पदी निवड