सायकल वारीतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश – भजेपारच्या पर्यावरण दूतांचे गांधीजींना अनोखे अभिवादन

0
502

सालेकसा : बाजीराव तरोने

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त भजेपार येथील पर्यावरण दूतांनी सायकल वारीद्वारे महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांना अनोखी श्रद्धांजली अर्पण केली. माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत आयोजित या सायकल रॅलीतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला गेला.

ग्राम पंचायतीच्या आवाहनानुसार, गावातील महिला, पुरुष, युवक, युवती आणि ज्येष्ठ नागरिकांसह विद्यार्थ्यांनी हिरहिरीने भाग घेतला. भजेपार, माताटोला, आणि नदीटोला या मार्गावर सायकल वारी झाली. वाटेत संत गाडगेबाबा, छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले.

“सायकल चालवा, प्रदूषण थांबवा,” “झाडे लावा, झाडे जगवा,” आणि “प्लास्टिकचा वापर टाळा” यांसारख्या घोषणांद्वारे जनजागृती केली गेली. रॅली संपल्यानंतर स्थानिक जिल्हा परिषद शाळेत महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून कार्यक्रम साजरा करण्यात आला.

त्यानंतर स्वच्छतेची सामूहिक शपथ घेऊन रॅलीचा समारोप करण्यात आला. या उपक्रमासाठी ग्राम पंचायत भजेपार, पर्यावरण दूत आणि विविध स्थानिक संस्थांनी मोठे सहकार्य केले.