पतंजली योग प्रशिक्षण केंद्राचा २० वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

0
240

वीस वर्षांची यशस्वी वाटचाल; शेकडो नागरिकांना निरोगी जीवनासाठी योगाचे योगदान

आमगाव: तालुक्यातील पतंजली योग प्रशिक्षण केंद्राने वीस वर्षे पूर्ण केली असून, या केंद्राने तालुक्यातील नागरिकांना निरोगी जीवनशैलीचा मार्ग दाखवला आहे. या निमित्ताने २ ऑक्टोबर २०२४ रोजी रिसामा येथील राधाकृष्ण मंदिर सभागृहात २० वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष नटवरलाल गोयल होते, तर प्रमुख अतिथी म्हणून आमगाव पोलीस निरीक्षक तिरुपती राणे, योग प्रशिक्षण केंद्राचे संस्थापक एल. एस. पारधी, डॉ. टी. के. पटले, दिनेश गीते आणि एडवोकेट लखन सिंह कटरे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. प्रशिक्षण केंद्राचे संस्थापक एल. एस. पारधी यांनी आपल्या भाषणात पतंजली योग प्रशिक्षण केंद्राच्या स्थापनेबाबत माहिती दिली. २००४ मध्ये नागपूर येथे बाबा रामदेव यांच्या सात दिवशीय योग शिबिरात प्रशिक्षण घेऊन आलेल्या पारधी यांनी २ ऑक्टोबर २००४ रोजी विजयालक्ष्मी सभागृहात योग प्रशिक्षण केंद्राची स्थापना केली होती. २००६ पासून हे केंद्र अखंड सुरू असून, अनेक ठिकाणी शिबिरे आयोजित करून योगाचे महत्त्व पटवून दिले आहे.

प्रमुख अतिथी पोलीस निरीक्षक तिरुपती राणे यांनी सांगितले की, लहानपणापासून योगाविषयी आवड असल्यामुळे पोलीस प्रशिक्षण काळातही ते नियमित योगा करत असत. योग आणि प्राणायामाचा प्राचीन धर्मग्रंथांमध्ये उल्लेख आहे आणि त्या काळातील राजे-महाराजेही योगाच्या माध्यमातून सुदृढता राखत असत. तरुण पिढीने देखील योगाचा अवलंब करून निरोगी जीवनशैली स्वीकारावी, असे आवाहन त्यांनी आपल्या भाषणातून केले.

पतंजली योग प्रशिक्षण केंद्राने गेल्या वीस वर्षांमध्ये पोलीस स्टेशन, ग्रामीण रुग्णालय, शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये अशा विविध ठिकाणी शिबिरांचे आयोजन करून योगाचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवले आहे.

कार्यक्रमाचे संचालन योग प्रशिक्षक के. टी. बिसेन यांनी केले, तर आभार प्रदर्शन बी. एफ. बोरकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योग साधक लक्ष्मीनारायण पटले, प्रा. अनिल सोरी, टी. के. तुरकर, गोविंद शेंडे, एस. डी. बारसागडे, राजू मोदी, अशोक चौहान, राजेश चौहान, अमित मोदी, मयूर बिसेन, अनिल सोरी, प्रेमलाल पडोरे, मुकुंद कावळे, मनोज मानकर, विवेकानंद सिंग, रंजित गनोरकर, शरणागतजी, पुजारी गुड्डू महाराज आणि राधाकृष्ण मंदिर समिती रिसामा चे अध्यक्ष आणि सचिव यांचे विशेष सहकार्य लाभले.