गोंदिया, (३ ऑक्टोबर ) : गोंदिया जिल्हा व विशेष सत्र न्यायालयाने बाघोलीतील बहुचर्चित हत्याकांडातील मुख्य आरोपी शारदा मुनेश्वर पारधी (वय २८ वर्षे) हिला जन्मठेपेची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. विवाहबाह्य अनैतिक संबंध टिकवण्यासाठी शारदा हिने पतीची निर्दयीपणे हत्या केली होती.
सदर प्रकरणात, शारदाचे विवाहबाह्य संबंध कुणाल मनोहर पटले याच्यासोबत होते. तिचा पती मुनेश्वर सहेशराम पारधी हा या संबंधांना अडथळा ठरत असल्यामुळे, २१ नोव्हेंबर २०२१ रोजी पहाटे शारदाने तिच्या प्रियकरासह संगनमत करून कु-हाडीने झोपेत असलेल्या पतीची हत्या केली. घटनेची माहिती शारदाने तिच्या मावशीला दिली होती, ज्यामुळे संशय अधिक बळावला.
सरकारी वकील अँड. कृष्णा डी. पारधी यांनी एकूण १४ साक्षीदारांची साक्ष नोंदवली. पुरावे ग्राह्य धरून मा. न्यायाधीश ए. टी. वानखेडे यांनी शारदाला भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा व ५,००० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सहआरोपी कुणाल पटलेला पुराव्याअभावी निर्दोष मुक्त करण्यात आले.
पोलीस निरीक्षक प्रताप भोसले यांनी तपास केला, तर पोलीस पैरवी कर्मचारी श्रीकांत मेश्राम यांनी प्रभावी कामगिरी बजावली.

