आमगाव : तालुक्यातील बाम्हणी येथे अपत्य नसल्याने आपले नाव अजरामर राहावे या उद्देशाने पंढरी बुवा (हगरुजी देशकर) आणि लुंगाबाई(पंढरीन) या दांपत्याने १९६६ साली विठ्ठल रखुमाई मंदिर बांधले होते. पंढरपूरच्या वारकरी संप्रदायाच्या भक्तीभावातून उभे केलेले हे मंदिर आता जीर्ण स्थितीत आले आहे. गावकऱ्यांनी लोकवर्गणी आणि श्रमदानाच्या माध्यमातून नवीन मंदिर उभारण्याचा निर्णय घेतला असून, यासाठी भूमिपूजन सोहळा ६ ऑक्टोबर रविवार रोजी पार पडला.
बाम्हणी गावातील विठ्ठल रखुमाई मंदिर हे गावाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेत महत्त्वाचे स्थान धारण करते. १९५० -६० च्या दशकात पंढरपूरची वारी करणारे पंढरी बुवा आणि लुंगाबाई हगरुजी देशकर या अपत्य नसलेल्या दांपत्याने आपले नाव भक्तिभावाने अजरामर राहावे यासाठी १९६६ साली हे मंदिर स्वखर्चाने उभारले होते. वृद्धावस्थेमुळे पुढे मंदिराची पूजा-अर्चा आणि देखभाल त्यांनी दत्तक मुलांकडे सोपवली. मात्र, कालांतराने मंदिर जीर्ण झाले.
गावकऱ्यांनी या ऐतिहासिक मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी एकत्र येत लोकवर्गणी आणि श्रमदानाच्या माध्यमातून नवीन मंदिर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या मंदिराच्या उभारणीसाठी भूमिपूजन सोहळा रविवार, ६ ऑक्टोबर रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यात गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, सरपंच, पोलीस पाटील, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
नवीन विठ्ठल रखुमाई मंदिर सार्वजनिक स्वरूपाचे राहणार आहे, ज्यामुळे गावकऱ्यांना या धार्मिक स्थळाचा लाभ घेता येईल. आर्थिक मदत गोळा करण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत, आणि गावातील सर्व लोक श्रमदानातून मंदिराच्या उभारणीसाठी योगदान देणार आहेत. गावकऱ्यांमध्ये या नव्या मंदिराबद्दल उत्सुकता असून, मंदिराच्या पुनर्निर्माणामुळे बाम्हणीच्या सांस्कृतिक आणि धार्मिक वारशाला नवा आयाम मिळेल, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
” पंढरी बुवा आणि लुंगाबाई(पंढरीन माय) यांच्या भक्तीचा वारसा पुढे नेणारे हे विठ्ठल रखुमाई मंदिर गावाच्या धार्मिक परंपरेचा भाग आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार होणे गावकऱ्यांसाठी अभिमानाचा विषय आहे, आणि हे नूतनीकरण भावी पिढ्यांसाठी श्रद्धेचे केंद्र ठरेल.”
— डॉ टीं.एम. नागरीकर(ग्रामस्थ)

