जागतिक सेरेब्रल पाल्सी दिनानिमित्त जनजागृती अभियान
गोंदिया : जिल्ह्यात जागतिक सेरेब्रल पाल्सी दिनाचे औचित्य साधून जनजागृती अभियान आयोजित करण्यात आले आहे. या अभियानाच्या निमित्ताने 6 ऑक्टोबर 2024 रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी सेरेब्रल पाल्सीग्रस्त बालकांच्या पालकांना आवाहन केले आहे की, चिंता न करता आता शीघ्र प्रतिसाद उपचार केंद्रातून मोफत उपचार उपलब्ध आहेत.
डॉ. हुबेकर यांनी सांगितले की, दर 1000 बालकांपैकी 3 ते 6 बालकांना सेरेब्रल पाल्सीचा धोका असतो. हे विकार जन्मावेळी मेंदूला ऑक्सिजनची कमतरता झाल्यामुळे निर्माण होतात, ज्यामुळे बालकांच्या स्नायूंमध्ये स्पासक्टिकपणा येतो. या स्थितीला सेरेब्रल पाल्सी म्हणतात. यामुळे मुलांमध्ये शारीरिक हालचाली आणि स्नायूंच्या विकासावर परिणाम होतो.
उपचार आणि पुनर्वसन : राष्ट्रीय बाल आरोग्य अभियान (RBSK) अंतर्गत, सेरेब्रल पाल्सीग्रस्त बालकांसाठी डीईआयसी (DIEC) केंद्रातून विशेष उपचार उपलब्ध आहेत. यामध्ये विविध पॅरामेडिकल स्टाफची मदत आणि फिजिओथेरपीद्वारे या बालकांना सुसह्य जीवन जगण्याची संधी मिळू शकते. पालकांनी निराश होण्याचे कारण नाही, कारण त्यांच्या मुलांच्या पुनर्वसनासाठी आरोग्य प्रशासन नेहमीच सहाय्य करीत आहे.
डॉ. हुबेकर यांनी पालकांना आवाहन केले की, अशा परिस्थितीत योग्य उपचार आणि व्यवस्थापनाद्वारे मुलांना आत्मनिर्भर जीवन जगण्याची संधी मिळू शकते.

