रेल्वे लाईनमुळे अडचणीत बाम्हणीचे शेतकरी – अंडरग्राउंड रस्त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना ठाम मागणी

0
665

रेल्वे गेट क्र.५४३ बंद होण्याच्या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन…

अंडरग्राउंड रस्ता मंजूर करण्याची मागणी…

आमरण उपोषणाचा इशारा.....

गोंदिया : जिल्ह्यातील आमगांव तालुक्यातील बाम्हणी गावातील शेतकऱ्यांनी शेतीला जाण्यासाठी अंडरग्राउंड रस्त्याची मागणी केली आहे. रेल्वे गेट क्रमांक ५४३ बंद होण्याच्या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांनी दि.७ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत तातडीने अंडरग्राउंड रस्ता मंजूर करण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.

गोंदिया जिल्ह्यातील बाम्हणी गावातील शेतकरी सध्या मोठ्या अडचणीत आहेत. गावातील रेल्वे गेट क्रमांक ५४३ वरून उडाणपुल मंजूर झाला आहे, ज्यामुळे गावातील रेल्वे गेट पूर्णपणे बंद होणार आहे. यामुळे ९५ टक्के शेतजमिनी रेल्वे लाईनच्या विरुद्ध बाजूस असल्याने शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी रस्ता शिल्लक राहणार नाही. तिसरी रेल्वे लाईन तयार झाल्यामुळे ही समस्या अधिक गंभीर झाली आहे, आणि आता शेतकऱ्यांना शेतीला पोहोचण्यासाठी पर्यायी मार्ग हवा आहे.

गावातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी अनेक वेळा आपली मागणी संबंधित अधिकाऱ्यांकडे मांडली आहे, परंतु अद्याप ठोस उपाययोजना झालेली नाही. या संदर्भात सरपंच ग्रामपंचायत बाम्हणी यांनी केलेल्या तक्रारींचे आणि ऑनलाइन निवेदनांचा संदर्भ दिला आहे. ०४ मार्च २०२३ रोजी प्रथम तक्रार दाखल करण्यात आली होती, त्यानंतर आणखी काही वेळा विनंत्या करण्यात आल्या आहेत, परंतु अद्याप प्रशासनाकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही.

शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीत जाण्यासाठी रेल्वे लाईन क्रमांक 973/10-8 DN Line आणि 973/9-7 Up Line यांच्या मधून अंडरग्राउंड रस्ता मंजूर करण्याची मागणी केली आहे. या मार्गाने शेतकऱ्यांना सुरक्षितपणे आपल्या शेतात पोहोचता येईल. रेल्वे लाईन ओलांडताना घडलेल्या अनेक अपघातांमध्ये शेतकऱ्यांचे प्राण गेले आहेत, आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत, म्हणून या मागणीला प्राधान्य दिले पाहिजे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

शेतकऱ्यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की, जर लवकरात लवकर अंडरग्राउंड रस्ता मंजूर न झाल्यास ते रस्त्यावर उतरून आंदोलन करतील. त्यात आमरण उपोषणाचा पवित्राही स्विकारला जाईल. शेतकऱ्यांनी सांगितले की, याबाबत कोणतीही निष्क्रियता सहन केली जाणार नाही आणि सरकारला या गंभीर समस्येची जाणीव करून दिल्याशिवाय ते मागे हटणार नाहीत.

गावकऱ्यांनी निवेदनात प्रशासनाकडे या समस्या सोडवण्यासाठी त्वरित सहानिशा करण्याची आणि अंडरग्राउंड रस्त्याचे काम मंजूर करण्याची मागणी केली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे शेतीकडे जाण्याचे मार्ग सुरक्षित होतील आणि त्यांच्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी दूर होतील.