आश्रमशाळा शिक्षकांच्या प्रलंबित समस्यांचे तात्काळ निराकरण करा: आमदार सुधाकर अडबाले यांचे निर्देश

0
331
1

देवरी आणि भंडारा प्रकल्पातील आश्रमशाळेतील शिक्षकांच्या समस्या निवारणासाठी समस्या निवारण सभा

गोंदिया : आमदार सुधाकर अडबाले यांच्या अध्यक्षतेखाली देवरी आणि भंडारा प्रकल्पातील आश्रमशाळांतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्यांवर चर्चा झाली. या चर्चेत त्यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांना प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्याचे निर्देश दिले.

विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या “समस्या तुमच्या, पुढाकार आमचा” या उपक्रमांतर्गत ७ ऑक्टोबर २०२४ रोजी देवरी प्रकल्प कार्यालयात एक समस्या निवारण सभा आयोजित करण्यात आली होती. ही सभा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी आणि भंडारा प्रकल्पांतर्गत आश्रमशाळांतील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्यांवर आधारित होती. सभेचे अध्यक्षस्थान सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले यांनी भूषवले होते, आणि सभा तीन तास चालली.

सभेत आमदार सुधाकर अडबाले यांनी प्रकल्पातील सर्व प्रलंबित प्रकरणे त्वरित निकाली काढण्याचे आदेश दिले. त्यांनी विशेषत: वेतन देयके २० तारखेच्या आत सादर करण्याची सूचना दिली आणि वेतन वितरणात कोणत्याही प्रकारची दिरंगाई होणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.

याशिवाय, सेवानिवृत्त किंवा मयत कर्मचाऱ्यांच्या पेन्शन केस आणि इतर आर्थिक लाभांची प्रकरणे, जीपीएफ व डीसीपीएस पावत्यांचे त्वरित वितरण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. एकस्तर वेतनश्रेणी लागू करणे, सेवा पुस्तिका पडताळणी, अर्जित रजा वेतन, वैद्यकीय रजा, प्रसूती रजा, आणि इतर रजा मंजुरीची प्रक्रिया त्वरित पूर्ण करण्याबाबतही त्यांनी जोर दिला.

प्रकल्पातील मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ देण्याची सूचना देखील आमदार अडबाले यांनी केली. यावेळी प्रकल्पातील अनेक प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात आली आणि संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यांना तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश दिले.

सभेला उपस्थित असलेल्या प्रमुख व्यक्तींमध्ये देवरी प्रकल्प अधिकारी उमेश काशीद, भंडारा प्रकल्प अधिकारी नीरज मोरे, तसेच प्रकल्प कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी होते.

विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे भंडारा जिल्हाध्यक्ष सुधाकर देशमुख, जिल्हा कार्यवाह राजेश धूर्वे, गोंदिया जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश गुप्ता, रतन वासनिक, सूर्यकांत केंद्रे, आदिवासी आश्रमशाळा संस्कृती संघटनेचे भोजराज फुंडे, कटरे सर, प्राचार्य धनराज हुकरे, राजेश सलामे, महेंद्र मेश्राम, प्राचार्य जी. एम. मेश्राम, आणि समस्याग्रस्त आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने या सभेत सहभागी झाले होते.