गोंदिया, दि. 8: जिल्ह्यात भात पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढत असून, पाने गुंडाळणारी अळी व लष्करी अळी या किडींचा आर्थिक नुकसान पातळीवरील आढळ देवरी तालुक्यात झाला आहे. कृषि विभागाने यावर तात्काळ उपाययोजना सुचविल्या आहेत.
पिकावरील सर्वेक्षण: पिकावरील किड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप) अंतर्गत, 1 जुलै 2024 पासून खरीप हंगामासाठी भात पिकांचे सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. नोव्हेंबर 2024 पर्यंत हे सर्वेक्षण चालू राहणार आहे. या सर्वेक्षणाद्वारे शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये जाऊन पिकांची तपासणी करून, किडींचा प्रादुर्भाव आढळल्यास योग्य मार्गदर्शन केले जाते.
लष्करी अळीचे व्यवस्थापन:
लष्करी अळी ही भात पिकाच्या पक्वतेच्या काळात मोठे नुकसान करते. कमी प्रमाणात असताना अळ्या झाडांच्या बुंध्यात, दगडांखाली आणि पाण्याविरहित भागात दिवसा लपून राहतात आणि रात्री पिकांचे नुकसान करतात. या किडींच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी खालील उपाय करावेत:
धानाच्या बांधीत पाणी साठवून ठेवणे.
बांध साफ ठेवणे.
झाडांवरुन दोर किंवा फांद्या आडव्या फिरवून अळ्या खाली पाडाव्यात.
बेडकांचे संवर्धन करावे.
नियंत्रणासाठी, डाक्लोरव्हास 76 ई.सा. 12.50 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
पाने गुंडाळणारी अळीचे व्यवस्थापन:
या किडीचा प्रादुर्भाव असल्यास शेतकऱ्यांनी पुढील उपाययोजना कराव्यात:
बिव्हेरिया बॅसियाना 1.15% 2.5 कि./हेक्टर, क्विनॉलफॉस 25% 26 मि.ली., किंवा क्लोरोपायरीफॉस 20% प्रवाही 20 मि.ली. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
ट्रायझोफॉस 40% प्रवाही 25 मि.ली. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
अशा प्रकारे, कृषि विभागाने शेतकऱ्यांना त्वरित उपाययोजना करून किडींचा प्रादुर्भाव रोखण्याचे आवाहन केले आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अजित आडसुळे यांनी कळविले आहे.

