
सालेकसा / मायकल मेश्राम
मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठानच्या दुसऱ्या विदर्भ लेखिका साहित्य संमेलनात सेवादल महिला महाविद्यालय, नागपूर येथे भव्य गझल मुशायरा सत्राचे आयोजन करण्यात आले. जेष्ठ साहित्यिका विजयाताई मारोतकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या संमेलनात महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून आलेल्या कवयित्रींनी सहभाग घेतला.
गझल मुशायरा सत्राचे अध्यक्षस्थान ऍड. मंगलाताई नागरे यांनी भूषविले. सत्रात दहा गझलकारांनी आपल्या गझलेच्या सादरीकरणाने उपस्थित साहित्यप्रेमींना मंत्रमुग्ध केले. सालेकसा येथील कवयित्री किरणताई मोरे-चव्हाण यांनी महिला अत्याचाराच्या गंभीर विषयावर आधारित गझल सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली.
संमेलनाच्या आयोजक विजयाताई मारोतकर यांनी किरणताई मोरे-चव्हाण यांचा विदर्भातील प्रमुख लेखिका म्हणून सन्मानचिन्ह प्रदान करून गौरव केला. यासोबतच डॉ. सुशील मेश्राम संपादित बुद्धिझम आणि देहदान-अवयवदान या प्रबोधनपर पुस्तकासह प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात जेष्ठ साहित्यकार उषाकिरण आत्राम, निर्मला जीवने यांच्यासह विदर्भातील अनेक मान्यवर साहित्यिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संमेलनाने साहित्यिक एकात्मता व विचारांचे आदान-प्रदान यावर भर दिला, ज्यामुळे उपस्थित साहित्यप्रेमींना एक नवीन प्रेरणा मिळाली.


