गोंदिया, दि.8 : महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत गोंदिया येथे सन 2024-25 शैक्षणिक सत्रापासून सुरु होणाऱ्या विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील मुलांच्या व मुलींच्या शासकीय वसतिगृहाचे 9 ऑक्टोबर रोजी दुपारी 1.30 वाजता केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे हस्ते दुरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रम विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील मुलींचे शासकीय वसतिगृह, संकल्प चौक, गणेशनगर, गोंदिया येथे आयोजित करण्यात आलेला आहे.
गोंदिया जिल्ह्यातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील मुलांना व मुलींना जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणे सोईचे व्हावे यासाठी विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील मुलांचे व मुलींचे शासकीय वसतिगृह सन 2024-25 या शैक्षणिक सत्रापासून महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत सुरु करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दुरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित राहणार आहेत. तर गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्री अतुल सावे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच या कार्यक्रमास अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
सदर कार्यक्रमास खासदार सर्वश्री प्रफुल पटेल, डॉ.प्रशांत पडोळे, डॉ.नामदेव किरसान, आमदार सर्वश्री डॉ.परिणय फुके, अभिजित वंजारी, सुधाकर अडबाले, विजय रहांगडाले, विनोद अग्रवाल, मनोहर चंद्रिकापुरे, सहसराम कोरोटे, जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले, इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या प्रधान सचिव विनीता सिंघल, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे संचालक ज्ञानेश्वर खिलारी, जिल्हाधिकारी प्रजित नायर, मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम, पोलीस अधीक्षक गोरख भामरे आदी विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
शासकीय वसतिगृहाच्या उद्घाटन सोहळ्याला नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे प्रादेशिक उपसंचालक विजय वाकुलकर व इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक विनोद मोहतुरे यांनी केले आहे.