
गोंदिया : महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांचेतर्फे 2 ऑक्टोबर 2023 ते 1 ऑक्टोबर 2024 वर्षभर महाराष्ट्रात महिला सशक्तीकरण धोरणाअंतर्गत महिलांच्या आर्थिक सक्षमीकरण व सशक्तीकरण करण्याकरीता विविध कार्यक्रम व महिलांचे कौशल्य मेळावे राबविण्यात आले आहे. शासनाच्या विविध योजनांचा महिला व बालकांना लाभ होईल या अनुषंगाने तसेच महिलांचे आर्थिक सक्षमीकरण व उद्योजकता या विषयी तज्ञ व्याख्याते मार्गदर्शन करणार आहेत.
महिला व बालकांसंबंधित शासनाच्या इतर योजना महिलांपर्यंत पोहचविण्याकरीता जिल्हास्तरीय महिला मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत 10 ऑक्टोबर 2024 रोजी ‘‘मोदी मैदान’’ गोंदिया येथे सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (उमेद) तसेच राष्ट्रीय शहरी अभियान (NULM) यांच्या अधिनस्त बचत गटातील महिला या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तुषार पौनीकर यांनी कळविले आहे.


