➡️ महायुती सरकारच्या शेतकरी, महिला, युवक आणि कामगारांसाठी महत्त्वपूर्ण योजना सुरूच राहणार
भंडारा : पवनी येथे महायुती सरकारच्या कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार प्रफुल पटेल यांनी जनकल्याणकारी योजना बंद होणार नाहीत असे स्पष्ट केले. विरोधकांवर टीका करत त्यांनी शेतकरी, महिला, युवक आणि कामगारांसाठी सुरू असलेल्या योजनांची यशस्वी अंमलबजावणी सुरूच राहील, असे सांगितले. या कार्यक्रमात माजी जिल्हा परिषद सभापती रेखा भुसारी आणि नीलकंठ टेकाम यांनी प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
सभा घेताना प्रफुल पटेल यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या महत्त्वाच्या निर्णयांचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, “शेतकरी कृषी पंपाच्या विज बिल माफीसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त प्रयत्नांनी किसान सन्मान योजनेद्वारे शेतकऱ्यांना आर्थिक मदत पुरवली जात आहे.” त्यांनी यावर्षीही २५ हजार रुपये बोनस देण्यासाठी सरकारकडून सकारात्मक चर्चा सुरू असल्याचे स्पष्ट केले.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘लाडली बहीण’ योजनेच्या माध्यमातून बँक खात्यांमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाल्याचे पटेल यांनी नमूद केले. तसेच मुलींना व्यावसायिक शिक्षणात निशुल्क प्रवेश आणि युवकांना युवा कार्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून रोजगारसंधी निर्माण करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
विरोधक भ्रम निर्माण करून योजना बंद होणार असल्याचा अपप्रचार करत असल्याचे पटेल यांनी ठामपणे फेटाळले. “या योजना बंद होणार नाहीत, उलटपक्षी या योजना अधिक जोमाने चालू राहतील,” असे त्यांनी सांगितले. आगामी निवडणुकांसाठी या योजनांच्या सातत्यासाठी जनतेने साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
नव्या कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश: या कार्यक्रमात माजी जिल्हा परिषद सभापती रेखा भुसारी आणि नीलकंठ टेकाम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी देखील प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आणि पक्षात सामील झाले.
कार्यक्रमात नानाभाऊ पंचबुद्धे, धनंजय दलाल, सुनील फुंडे, सरिता मदनकर, सुनंदा मुंडले, विजय सावरबांधे, हरीश तलमले, शैलेश मयूर, मुकेश बावनकर, लोकेश वैदय, चेतन डोंगरे, छोटु बाळबुधे, जीतू नखाते, किशोर पालान्दूरकर, ललित खोब्रागडे, शेखर पडोळे, नूतन कुरझेकर, नंदू कुरझेकर, सीमा गिरी, मनोज कोवासे, हेमंत श्रुगांरपवार, शोभना गोरशेट्टीवार, हेमंत महाकाळकर, सोनू रंगारी, हेमंत मेनवाडे, चरण पलवार, टिंकू सेलोकर, विजय ठक्कर, पुष्पा भूरे, जयाशिला भूरे, सोमेश्वर भूरे, तोमेश्वर पंचभाई, नूतन खंदाडे, प्रेमसागर गजभिये, गोपाल करिहार, देवांगना गजभिये, संविधान नवनागे, शुभम गजभिये, मोरेश्वर लांजेवार, सैय्यद परवेज, यशवंत लांजेवार यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

