➡️ कलेतून बनवली आपली ओळख
सालेकसा:बाजीराव तरोने
अलीकडच्या काळात कोणतेही क्षेत्र मर्यादित राहिलेले नाही. आज महिला आणि पुरुष सर्वच क्षेत्रांत एकत्र काम करत आहेत. लावणी नृत्याच्या क्षेत्रातही आता पुरुषांचीही ओळख निर्माण होत आहे. लावणीच्या क्षेत्रात आपले करिअर घडवून सालेकसा तालुक्यातील कारुटोला येथील तेजस उमराव बोहरे या युवकाने आपली वेगळी ओळख तयार केली आहे.
घुंगरांच्या तालावर तेजसची जादू
लावणी नृत्याचा विशेष आकर्षण आणि महत्त्व आहे. पारंपरिक पद्धतीने लावणी महिला कलाकारांकडून सादर केली जाते, परंतु आजकाल पुरुष कलाकारदेखील या क्षेत्रात उत्तम कामगिरी करत आहेत. तेजसने “बाई मला लागली कुणाची उचकी” या लोकप्रिय गाण्यासह इतर अनेक लावणी गाण्यांवर बहारदार नृत्य सादर करून आपला खास ठसा उमटविला आहे. त्याच्या या अनोख्या कामगिरीने त्याला अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
शिक्षणाआधी कला क्षेत्रात करिअरची निवड
तेजसने बीएससीपर्यंत शिक्षण घेतले आहे, पण त्यानंतर नोकरीच्या मागे न धावता त्याने कला क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. लावणी नृत्यात आत्मविश्वासाने वावरून त्याने शाळेच्या स्नेहसंमेलन, दुर्गा उत्सव, गणेश उत्सव आणि इतर अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये आपली नृत्यकला सादर केली.
पुरुषांसाठी नवीन दारं उघडणारा तेजस
सामान्यपणे लावणी महिला कलाकारांसाठीच मानली जाते, परंतु तेजससारख्या पुरुष कलाकारांनी या परंपरेला नव्या उंचीवर नेले आहे. तेजसच्या ठुमक्यांनी आणि लावणी नृत्यातील खास शैलीने तो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. त्याच्या उत्कृष्ट सादरीकरणामुळे अनेकांना भुरळ घालणाऱ्या तेजसने लावणी नृत्याच्या क्षेत्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

