जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव कृषि विभागाने सुचविल्या उपाययोजना

0
570

 गोंदिया, दि.15 : जिल्ह्यात भात मुख्य पीक असून या पिकावर खोडकिडा, गादमाशी व तपकिरी/हिरवे तुडतुडे ह्या सतत प्रादुर्भाव करणाऱ्या किडी आहे. परंतु सद्यस्थितीतील पिकाची अवस्था व वातावरण हा लष्करी अळीच्या प्रादुर्भाव पोषक असून केव्हाही उद्रेकीय स्थिती निर्माण होऊ शकते. तरी शेतकारी बांधवांनी आपल्या धान पिकाची पाहणी करुन खालीलप्रमाणे उपाययोजना कराव्या, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, गोंदिया यांनी  केले.

जीवनक्रम :- या अळीचा पतंग मध्यम आकाराचा 1 ते 2 से.मी. लांब असून समोरील पंख गडद पिंगट व त्यावर काळसर ठिपका आणि कडेवर नागमोडी पट्टे असतात. पुर्ण वाढलेली अळी 2.5 ते 4 से.मी. लांब लठ्ठ मऊ ‍हिरवी, काळी आणि अंगावर लाल पिवळसर उभ्या रेषा असतात. मादी 200 ते 300 अंडी समुहाने घालते, अंडे करड्या रंगाच्या केसांनी झाकलेली असतात. अंडी अवस्था 5 ते 8 दिवस, अळी अवस्था 20 ते 25 दिवस व कोषावस्था 10 ते 15 दिवसांची असून कोष धानाच्या बुंध्याजवळील बेचक्यात/जमिनीत आढळतात. एक पिढी पुर्ण होण्यास 30 ते 40 दिवस लागतात.

नुकसान :- लष्करी अळी धान पिकाचे रोवणीनंतर पीक पक्वतेच्यावेळी नुकसान करतात. कमी प्रमाणात प्रादुर्भाव असल्यास अळ्या दिवसा झाडाचे बुंध्यात, ढेकळाखाली, दगडाखाली, बांधीत पाणी नसतांना ढिगाऱ्याच्या खाली लपुन राहतात व रात्री पिकाचे नुकसान करतात. पीक पक्वतेच्यावेळी अळ्या लोंब्या कुरतडून शेतात लोंब्याचा सडा पाडतात.

आर्थिक नुकसानीची पातळी :- 4 ते 5 अळ्या प्रति चौ.मी.

व्यवस्थापन :- या किडीच्या नियंत्रणाकरीता धानाच्या बांधीत पाणी साठविणे, बांध साफ करणे, पिकावरुन दोर किंवा झाडाच्या फांद्या आडव्या फिरवून अळ्या खाली पाडाव्यात व बेडकाचे संवर्धन करावे. प्रकाश सापळ्यांचा वापर करावा. अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास चुडात किंवा जमिनीवर दिसणाऱ्या अळ्या गोळा करुन नष्ट कराव्या. भाताची कापणी झाल्यावर खोलवर नांगरणी करुन धसकटे जाळून नष्ट करावी. किडीच्या नियंत्रणाकरीता आयसोक्लोसेरम 18.1 टक्के 6 मि.ली./10 लिटर पाण्यात किंवा ईमामेक्टीन बेझोएट 1.5 टक्के अधिक प्रोफेनोफॉस 35 टक्के डब्लुजी 15 ग्राम/10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.