चंद्रपूर प्रतिनिधी मनोज गोरे
भद्रावती.रात्रोच्या वेळेस आपल्या वडिलासोबत अंगणात खेळत असलेल्या एका एक वर्ष बालिकेवर एका बिबट्याने अचानक हल्ला केला. त्यात ती बालिका जखमी झाली. तानीया निलेश वाकडे वय एक वर्ष, राहणार आयुध निर्माणी वसाहत. असे या जखमी बालिकेचे नाव आहे. सदर घटना दिनांक 14 ला रात्रो साडेनऊ वाजताच्या सुमारास शहरातील निर्माणी वसाहतीत घडली. सदर बालिकेला चंद्रपूर येथील एका दवाखान्यात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. आयुध निर्माणीतील टाईप वन सेक्टर वन क्वार्टर नंबर 24 बी येथे राहणारे निलेश वाकडे हे रात्रोला आपल्या क्वार्टरच्या अंगणात बसले होते व जवळच त्यांची तानिया नावाची मुलगी खेळत होती. बाजूला दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक बालिकेवर हल्ला करून तिला जखमी केले. वडिलाने आरडाओरड केल्यानंतर बिबट्याने पळ काढला.सदर घटनेची माहिती प्राप्त झाल्यानंतर वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन घटनेचा पंचनामा केला. पुढील कार्यवाही भद्रावती वनपरिक्षेत्र कार्यालयातर्फे सुरू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून वसाहतीत बिबट्याचा उपद्रव बंद होता. मात्र या घटनेमुळे वसाहतीत बिबटे पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे.