आमगांव : तालुका कृषी अधिकारी महेंद्र दिहारे यांनी शेतकऱ्यांना भात पिकावर होणाऱ्या “तपकिरी तुडतुडे” किडीच्या प्रादुर्भावाबाबत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. भात पिकात पाण्याचा योग्य निचरा न झाल्यास आणि खतांचा अधिक वापर झाल्यास या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. किडीची पिल्ले आणि प्रौढ तुडतुडे झाडाच्या खोडातून रस शोषतात, ज्यामुळे झाडांची पाने पिवळी पडून निस्तेज होतात आणि हळूहळू झाडे सुकून जातात. प्रादुर्भाव वाढल्यास शेतात गोलाकार खळ्यांसारखा भाग तयार होतो, ज्याला “हॉपर बर्न” म्हणून ओळखले जाते.
दिहारे यांनी शेतकऱ्यांना शेतातील पिकाची नियमित तपासणी करण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून किडीचा प्रादुर्भाव वाढण्यापूर्वी त्यावर नियंत्रण मिळवता येईल. आर्थिक नुकसान टाळण्यासाठी, इमिडॅक्लोफिड 17.8 एसएल (5 मिली), फ्रीप्रोनिल 5 एससी (20 मिली), किंवा इंथोफेन प्राक्स 10% प्रवाही (10 मिली) या कीटकनाशकांपैकी कोणतेही एक 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असे त्यांनी सुचविले आहे.
शेतकऱ्यांनी या उपाययोजनांचा अवलंब करून भात पिकांचे संरक्षण करावे आणि संभाव्य आर्थिक नुकसान टाळावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी महेंद्र दिहारे यांनी केले आहे.

