आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करा,जिल्हाधिकाऱ्यांचे विभाग प्रमुखांना निर्देश..

0
84

 

ग‍डचिरोली दि. 16 : भारत निवडणूक आयोगाने 15 ऑक्टोबर 2024 रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर जिल्ह्यात निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे प्रत्येकाने निवडणुकीचे गांभिर्य लक्षात घेऊन आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी तसेच सोपविलेली जबाबदारी गांभिर्याने पार पाडावी असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने यांनी आज दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित नोडल अधिकारी व विभाग प्रमुखांच्या बैठकीत जिल्हाधिकारी दैने बोलत होते. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक नलोतप्पल उपजिल्हा निवडणूक अधिकारी विवेक घोडके, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, तसेच विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

निवडणुक कार्यक्रमांतर्गत प्रत्येक कामासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणेने तत्पर राहावे व कोणत्याही विभाग प्रमुखाने जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये अथवा रजेवर जावू नये असे निर्देशही  दैने यांनी दिले. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांचे वाचन करून त्यानुसारच त्याची अंमलबजावणी करावी. कार्यालय व परिसरातील विकास कामांचे भूमिपूजन फलक, कोनशीला, राजकीय व्यक्तींची छायाचित्रे व पक्षाची चिन्हे असलेले बॅनर, होर्डिंग्ज तात्काळ काढण्यात यावे. रस्ते व सावजनिक जागेवर प्रचार साहित्य लागणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी दैने यांनी दिल्या.

निवडणूकीच्या तसेच अत्यावश्यक सेवेत कर्तव्यावर असलेले कोणताही कर्मचारी पोस्टल बॅलेट मतदानापासून वंचित राहणार नाही, यांची दक्षता संबंधीत कार्यालय प्रमुखांनी घ्यावी यासाठी कार्यालयात एक समन्वयक अधिकारी नेमून मतदानासाठीचे विहित फॉर्म भरून घ्यावे.

जिल्ह्यात कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी मतदानासाठी मतदार नोंदणी करून घ्यावी. ज्यांची मतदार नोंदणी इतर जिल्ह्यात आहे मात्र ते आता या जिल्ह्यात कार्यरत आहेत त्यांनीही आपली मतदार नोंदणी गडचिरोली जिल्ह्यात स्थलांतरीत करण्यासाठी अर्ज करावे व सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी 100 टक्के मतदान करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी दैने यांनी दिल्या.

बैठकीला विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.